वॉशिंग्टन : अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेल्या क्वाड शिखर परिषदेला हजर राहण्याच्या निमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या अमेरिका दौऱ्यात भारताला मोठे यश मिळाले आहे. तस्करीच्या माध्यमातून देशाबाहेर नेलेल्या व भारतीय संस्कृतीशी संबंधित २९७ अनोख्या व दुर्मीळ वस्तू अमेरिकेने भारताला परत केल्या आहेत.
भारतातून होणारी मौल्यवान आणि पुरातन वस्तूंची चोरी, तस्करी ही गंभीर समस्या आहे. भाजप सत्तेवर आल्यापासून म्हणजे २०१४ पासून, भारताने परदेशातून सुमारे ६४० वस्तू परत मिळवल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’वर पोस्ट करून याबाबत बायडेन यांचे आभार मानले आहेत. मोदी म्हणतात की, अमेरिकेच्या या कृत्यामुळे अवैध व्यापार आणि सांस्कृतिक संबंधांविरुद्धचा लढा अधिक मजबूत होत आहे.
२९७ दुर्मीळ कलाकृती परत केल्याबद्दल भारत अध्यक्ष जो बायडेन आणि अमेरिका सरकारचे आभारी आहे. या आधीही मोदींच्या अमेरिका दौऱ्यात अनेक प्राचीन वस्तू भारताला परत करण्यात आल्या होत्या. २०२१ मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदी अमेरिकेला गेले होते तेव्हा त्यांना १५७ दुर्मीळ वस्तू परत करण्यात आल्या होत्या.
त्यात १२ व्या शतकातील नटराज मूर्तीचाही समावेश होता. २०२३ मध्ये पंतप्रधान मोदींच्या भेटीवेळी अमेरिकेने १०५ वस्तू भारताला परत केल्या होत्या. अमेरिकेतून ५७८ प्राचीन आणि अमूल्य वस्तू भारतात परत आणण्यात आल्या आहेत.
अमेरिका भेटीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष जो बायडने यांना रेल्वेच्या चांदीची प्रतिमा भेट दिली आहे. प्रत्येकी एका बाजूला या प्रतिमेवर इंडियन रेल्वे असे इंग्रजी आणि हिंदीमध्ये लिहले आहे. तसेच दिल्ली-डेलावेअर अशी अक्षरे कोरली आहेत. ही प्रतिमा महाराष्ट्रातील कामगारांनी आपल्या अनोख्य कौशल्यातून तयार केली आहे. तसेच मोदींंनी बायडेन यांच्या पत्नी जिल यांना जगप्रसिद्ध पश्मिना शाल भेट दिली आहे.