संग्रहित छायाचित्र
किव्ह : युक्रेनच्या सैन्याने आक्रमक मुसंडी मारत रशियाची सीमा ओलांडून ३० कि.मी. आत प्रवेश केला आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनने रशियाच्या हद्दीत प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. युक्रेनने रशियाचा २५० चौरस किलोमीटरचा प्रदेश ताब्यात घेतला आहे.
युक्रेनच्या सैन्याचे पुढील लक्ष्य सुदजा हे रशियाचे शहर आहे. युक्रेनने रशियाच्या हद्दीत प्रवेश केल्याचे सोशल मीडियावर अनेक व्हीडीओ व्हायरल झाले असून त्यात युक्रेनचे सैनिक इमारतींवरील रशियाचा ध्वज काढून तेथे आपल्या देशाचा ध्वज लावत असल्याचे दिसत आहे. युक्रेनचे आक्रमण रोखण्यासाठी रशिया शक्य ते सर्व प्रयत्न करत असून संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार टोलपिनो, ओब्श्ची कोलोडझे येथे रशियन युक्रेनच्या सैन्याशी लढा देत आहे.
त्यातच कुर्स्क भागात सहाव्या दिवशीही युक्रेनने आपल्या हल्ल्याची तीव्रता कायम ठेवली आहे. रशियाने संभाव्य आक्रमणाच्या शक्यतेने ८ ऑगस्ट रोजी या भागात आणीबाणी लागू केली होती. केवळ २४ तासांत युक्रेन सैन्याने कुर्स्क प्रदेशातील दोन मोठ्या तटबंदी नष्ट केल्या. तटबंदीसाठी रशियाला अडीच वर्षांपेक्षा जास्त वेळ लागला होता. तसेच १७० दशलक्ष डॉलर खर्च झाला होता. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा या म्हणाल्या की, रशियन लष्कर या आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देईल.
आम्ही युक्रेनच्या दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करतो. त्याचा उद्देश रशियन नागरिकांना मारणे, घाबरवणे आणि पायाभूत सुविधा नष्ट करणे हा आहे. ज्या भागात ही लढाई सुरू आहे तो भाग कुर्स्क आण्विक प्रकल्पाजवळ आहे. हा प्रकल्प रशियामधील सर्वात मोठ्या अणु प्रकल्पांपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचे प्रमुख राफेल ग्रोसी हे म्हणाले की, आण्विक अपघात रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील.‘टाईम’ने याबद्दल म्हटले आहे की, युक्रेनच्या सैन्याला रशियामध्ये किरकोळ यश मिळाले आहे. मात्र, पुतिनसाठी ही लज्जास्पद परिस्थिती आहे. या घटनेमुळे त्यांची ताकदवान ही प्रतिमा खराब झाली आहे. दरम्यान, युक्रेनच्या सीमेजवळ राहणाऱ्या ७६ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.