सुपर ओव्हर कब आयेगा?

इंडियन प्रीमियर लीगचे १६ वे सत्र रंगतदार वळणावर आले आहे. प्ले ऑफसाठी पात्र कोण ठरणार, याची चर्चा आता सुरू होईल. या मोसमात अखेरच्या चेंडूवर निकाल लागणाऱ्या अनेक रंगतदार लढती झाल्या असल्या तरी सुपर ओव्हरपर्यंत मात्र एकही सामना ताणला गेला नाही. यंदाच नव्हे तर मागील वर्षीदेखील संपूर्ण आयपीएल स्पर्धी सुपर ओव्हरविना झाली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 25 Apr 2023
  • 06:33 am
 सुपर ओव्हर कब आयेगा?

सुपर ओव्हर कब आयेगा?

आयपीएलमध्ये १४७ सामन्यांपासून प्रतीक्षा, २००९ मध्ये पहिल्यांदा वापर, आतापर्यंत १४ सामने सुपर ओव्हरमध्ये

#मुंबई

इंडियन प्रीमियर लीगचे १६ वे सत्र रंगतदार वळणावर आले आहे. प्ले ऑफसाठी पात्र कोण ठरणार, याची चर्चा आता सुरू होईल. या मोसमात अखेरच्या चेंडूवर निकाल लागणाऱ्या अनेक रंगतदार लढती झाल्या असल्या तरी सुपर ओव्हरपर्यंत मात्र एकही सामना ताणला गेला नाही. यंदाच नव्हे तर मागील वर्षीदेखील संपूर्ण आयपीएल स्पर्धी सुपर ओव्हरविना झाली. एकूण सामन्यांचा विचार करता २०२१ नंतर गेल्या १४७ सामन्यांत सुपर ओव्हरचा थरार बघायला मिळालेला नाही. त्यामुळे कट्टर क्रिकेटप्रेमींच्या मनात ‘सुपर ओव्हर कब आयेगा,’ हा प्रश्न सातत्याने येत आहे.

आयपीएलच्या १४ व्या मोसमात म्हणजे २०२१ स्पर्धेतील २० व्या सामन्यात शेवटची सुपर ओव्हर झाली होती. २५ एप्रिल रोजी झालेल्या त्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघ सनरायझर्स हैदराबादविरुद्ध वरचढ ठरला होता. त्या हंगामात, सुपर ओव्हरनंतर ४० सामने झाले. २०२२ मध्ये संपूर्ण ७४ सामने आणि या हंगामात रविवारपर्यंत (दि. २४) झालेले ३३ सामने असे एकूण १४७ सामने झाले. यापैकी एकदाही सुपर ओव्हरचा थरार क्रिकेटप्रेमींना अनुभवता आलेला नाही.  

या मोसमात असे अनेक सामने खेळले गेले ज्यांचा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला. काही वेळा सामना सुपर ओव्हरमध्ये जाईल असे वाटत होते, पण तसे झाले नाही. आयपीएलमधील सुपर ओव्हरची प्रतीक्षा दिवसेंदिवस लांबतच आहे. आयपीएलमध्ये २००९ मध्ये पहिल्यांदा सुपर ओव्हरचा वापर करण्याची वेळ आली. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे झालेल्या त्या सामन्यात राजस्थानने कोलकात्याला पाणी पाजले होते.

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत एकूण १४ सुपर ओव्हर सामने खेळले गेले आहेत. २००९ मध्ये पहिल्यांदाच आयपीएलमध्ये सुपर ओव्हर पाहायला मिळाली. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स  आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने होते. युसूफ पठाणच्या फलंदाजीच्या बळावर राजस्थानने बाजी मारली होती.  कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना १५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, युसूफ पठाणच्या फटकेबाजीमुळे राजस्थानने 

चार चेंडूत विजय मिळवला.

२०२० मध्ये सर्वाधिक चार सुपर ओव्हर खेळल्या गेल्या. २०१३ आणि २०१९ मध्ये दोन सुपर ओव्हर खेळवण्यात आल्या होत्या. २००९, २०१०, २०१४, २०१५, २०१७ आणि २०२१ मध्ये प्रत्येकी एक सुपर ओव्हर झाली. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या १५ हंगामात एकूण १४ सुपर ओव्हर सामने झाले. यात ६ हंगाम आहेत ज्यात एकही सुपर ओव्हर झाली नाही. यामध्ये २००८, २०११, २०१२, २०२६, २०१८ आणि २०२२ या हंगामांचा समावेश आहे.

   

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story