संग्रहित छायाचित्र
मुंबई: आयपीएल २०२५ च्या महालिलावात यावेळी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी देखील सहभागी होणार आहे. गुजरात टायटन्स संघाने शमीला पुढील हंगामापूर्वी रिलीज केले आहे. यानंतर आता मोहम्मद शमीला लिलावात किती बोली लागू शकते याचे विश्लेषण करताना माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी भाष्य केले. यावेळी आयपीएल लिलावात शमीवर लागल्या जाणाऱ्या बोलीची किंमत कमी असू शकते, असे मांजरेकर म्हणाले होते. त्यानंतर आता मोहम्मद शमीने संजय मांजरेकरांना इन्स्टाग्रामवर पोस्ट करत चोख प्रत्युत्तर दिले आहे.
पायाच्या दुखापतीमुळे वर्षभराच्या विश्रांतीनंतर मोहम्मद शमीने गेल्या आठवड्यात स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. ३४ वर्षीय खेळाडूने सात विकेट घेत बंगालला मध्य प्रदेशवर विजय मिळवून दिला. मोहम्मद शमीला २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी जेद्दाह येथे आयपीएल मेगा लिलावापूर्वी गुजरात टायटन्सने रिलीज केल होते. आयपीएलमध्ये मोहम्मद शमीला कमी किमतीत संघ खरेदी करतील अशी शक्यता वर्तवत संजय मांजरेकर म्हणाले की, दुखापतीने त्रस्त असलेल्या या वेगवान गोलंदाजाच्या किमतीत मोठी घट होण्याची शक्यता आहे. स्टार स्पोर्ट्सवर संजय मांजरेकर म्हणाले होते, ‘संघ नक्कीच मोहम्मद शमीवर बोली लावतील, परंतु शमीच्या दुखापतीचा इतिहास पाहता, चालू हंगामात त्याला दुखापत झाल्यास मैदानाबाहेर जावे लागू शकते, याची संघांना चिंता असेल आणि त्याला हल्लीच झालेली दुखापत बरी होण्यासही बराच वेळ लागला आहे . जर एखाद्या फ्रँचायझीने मोठी गुंतवणूक केली आणि मग चालू हंगामात जर त्याला पुन्हा दुखापत झाली तर त्याच्या जागी कोण खेळणार याचे पर्याय मर्यादित होतात. या चिंतेमुळे त्याची किंमत कमी होऊ शकते.
संजय मांजरेकरच्या विश्लेषणाला मोहम्मद शमीने सडेतोड उत्तर दिले आणि त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले, “बाबा की जय हो. तुमच्या भविष्यासाठी थोडे ज्ञान राखून ठेवा, कामी येईल संजयजी. जर कोणाला त्यांचे भविष्य जाणून घ्यायचे असेल तर सरांना भेटा. मोहम्मद शमीच्या ही इन्स्टाग्राम स्टोरी इन्स्टाग्रामवर चांगलीच व्हायरल झाली आहे. शमीने संजय मांजरेकरांनी केलेल्या वक्तव्याचा फोटो शेअर करत खाली हे कॅप्शन दिले आहे. आयपीएल २०२२ मध्ये ६.२५ कोटी रुपयांसह गुजरात टायटन्सचा भाग असलेल्या शमीने ३३ सामन्यांत ४८ विकेट घेतल्या. मोहम्मद शमी २०२३ च्या हंगामात पर्पल कॅप विजेता होता. त्या मोसमात, त्याने १७ डावात १८.६४ च्या सरासरीने आणि ८.०३ च्या इकॉनॉमीने २८ विकेट्स घेतल्या. दीर्घकाळ दुखापतीशी झुंज दिल्यानंतर मोहम्मद शमीने आता मैदानावर शानदार पुनरागमन केले आहे. शमीने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळला होता. शमीने त्या विश्वचषकात चमकदार कामगिरी केली होती आणि तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाजही होता. आता रणजी ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात शमीने ८ विकेट घेतल्या.