संग्रहित छायाचित्र
मलागा : टेनिसविश्वातील सार्वकालीन महान खेळाडूंपैकी एक असलेला २२ ग्रँडस्लॅम स्पर्धांचा विजेता राफेल नदालने टेनिसमधून निवृत्ती घेतली आहे.
नदाल मंगळवारी (दि. १९) मलागा येथील घरच्या मैदानावर शेवटचा डेव्हिस कप सामना खेळला. यात त्याला पराभव पत्करावा लागला. नेदरलँड्सच्या ८०व्या मानांकित बोटिक व्हॅन डी झिडशल्पने ४-६, ४-६ने पराभूत केले. सलग २९ सामने जिंकून नदालला डेव्हिस कपमध्ये पराभव पत्करावा लागला आहे.
मार्टिन कार्पेना अरेना येथे सामन्यानंतर एका भावनिक व्हीडीओमध्ये ३८ वर्षीय दिग्गजाला निरोप देण्यात आला.
कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात राफेल नदाल भावूक झाला होता. सामन्यानंतर नदालच्या सन्मानार्थ निरोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्याने चाहत्यांसमोर आपले मत व्यक्त केले.
नदालने आपल्या निवृत्तीचा सन्मान करण्यासाठी आयोजित समारंभात अनेकांना श्रेय दिले. त्याने काका टोनी नदाल यांचे नाव घेतले. टोनी यांनी नदालला टेनिस खेळण्यासाठी प्रेरित केले. त्यांनीच नदालला प्रारंभी प्रशिक्षण दिले.
‘‘माझ्यासाठी, टायटल्स संख्या आहेत. माजोर्का मधील एका छोट्या गावातील मुलगा एक अद्भुत माणूस आहे. मी नशीबवान होतो की, मी लहान असताना माझे काका माझ्या गावात टेनिस प्रशिक्षक होते. त्यांच्यासह माझ्या कुटुंबाने प्रत्येक प्रत्येक क्षणात मला साथ दिली. त्यामुळेच मला हे यश मिळवणे शक्य झाले. जगात कुठेही गेलो तरी टेनिसप्रेमींनी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला,’’ असे नदाल यावेळी म्हणाला
नदालने मंगळवारी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. त्याने १० ऑक्टोबरलाच निवृत्ती जाहीर केली होती. पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा नदाल हा दुसरा खेळाडू आहे. नदालने २२ विजेतेपद पटकावले आहे. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत सर्बियाचा नोवाक जोकोविच अव्वल स्थानी आहे. त्याने आतापर्यंत २४ ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. दोन वर्षांपूर्वी स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडरर निवृत्त झाला. आता नदालनेही खेळाला अलविदा केला आहे. फेडररने २० ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावली होती.
'क्ले कोर्टचा राजा' म्हणून प्रसिद्ध
फ्रेंच ओपनचे जेतेपद सर्वाधिक १४ वेळा जिंकणारा नदाल हा पुरुष खेळाडू आहे. म्हणूनच नदालला क्ले कोर्टाचा राजा म्हटले जाते. फ्रेंच ओपन क्ले कोर्टवर म्हणजेच लाल खडीपासून बनवलेल्या कोर्टवर खेळले जाते. नदालनने फ्रेंच ओपनमध्ये १८ वेळा भाग घेतला, ११२ सामने जिंकले. फक्त चार सामन्यांत तो पराभूत झाला. त्यानेक २०२२ मध्ये १४व्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला होता. नदालने २०२२ मध्ये वयाच्या ३६व्या वर्षी ट्रॉफी जिंकली तेव्हा तो स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जुना चॅम्पियन बनला. फ्रेंच ओपनमध्ये १९ वेळा भाग घेत असताना नदालने ११२ सामने जिंकले आहेत आणि त्याला फक्त चार वेळा पराभवाला सामोरे जावे लागले, कोणत्याही एका ग्रँड स्लॅममधील पुरुष आणि महिला गटातील हा जागतिक विक्रम आहे.
‘गोल्डन स्लॅम’चा पराक्रम
गोल्डन स्लॅम जिंकणाऱ्या जगातील चार टेनिसपटूंमध्ये नदालचा समावेश आहे. २००८मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून नदालने गोल्डन स्लॅम पूर्ण केले. गोल्डन स्लॅम म्हणजे चारही ग्रँडस्लॅम आणि ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारा खेळाडू. २००८ मध्ये नदालने ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन, यूएस ओपन या चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या होत्या. त्याच्याव्यतिरिक्त स्टेफी ग्राफ (१९८८), आंद्रे आगासी (१९९९) आणि सेरेना विल्यम्स (२०१२) यांनी हा पराक्रम केला आहे.