संग्रहित छायाचित्र
कराची : माजी वेगवान गोलंदाज आकिब जावेद यांची पाकिस्तानी संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक बनू शकतात. जेसन गिलेस्पीला हटवून आकिब जावेदला सर्व फॉरमॅटची जबाबदारी दिली जाऊ शकते.
व्हाईट बॉल फॉरमॅटचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी राजीनामा दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज गिलेस्पी यांना अलीकडेच पाकिस्तानचे प्रशिक्षक बनवण्यात आले होते. ५२ वर्षीय आकिब सध्या पाकिस्तान पुरुष क्रिकेट निवड समितीमध्ये संयोजक म्हणून कार्यरत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) येत्या काही दिवसांत हा निर्णय जाहीर करू शकते.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका आटोपली की पाकिस्तान संघाला झिम्बाब्वे दौऱ्यावर जायचे आहे. आकिब जावेद यांच्यासाठी ही प्रशिक्षक म्हणून पहिली कसोटी मालिका असेल. आकिब यापूर्वी पाकिस्तान संघाचे सहाय्यक प्रशिक्षक होते. संयुक्त अरब अमिरातने त्यांना २०१३ मध्ये मुख्य प्रशिक्षक बनवले होते. जावेद यांनी एकदिवसीय प्रकारात १६३ सामन्यांत १८२ तर २२ कसोटींत ५४ बळी घेतले आहेत.
जावेद यांचा अलीकडेच पीसीबीच्या पाच राष्ट्रीय निवडकर्त्यांमध्ये समावेश करण्यात आला होता. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाने घरच्या मैदानावर चांगली कामगिरी केली आणि पाकिस्तान संघाने तीन वर्षे आठ महिन्यांनंतर घरच्या मैदानावर कसोटी मालिका जिंकली. अहवालानुसार, जावेद यांनी सपाट खेळपट्ट्यांऐवजी फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या बनवण्याचा आग्रह धरला होता. असे मानले जाते की गिलेस्पी प्रशिक्षक होते, परंतु जावेद निर्णय घेत होते.
दीड वर्षात पाच प्रशिक्षक
अकिब जावेद हे सुमारे दीड वर्षाच्या काळात पाकिस्तानला लाभलेले पाचवे मुख्य प्रशिक्षक असतील. यापूर्वी मिकी आर्थर, ग्रँट ब्रॅडबर्न, गॅरी कर्स्टन आणि जेसन गिलेस्पी यांनी हे या पदावर होते.
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ नंतर, पीसीबीने आपल्या सपोर्ट स्टाफमध्ये अनेक बदल केले. संघ २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. मिकी आर्थर, ग्रँट ब्रॅडबर्न आणि अँड्र्यू पुटिक यांनी विश्वचषकानंतर आपल्या पदांचा राजीनामा दिला. आर्थर यांची एप्रिल २०२३ मध्ये पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. ब्रॅडबर्न यांची गेल्या वर्षीच्या सुरुवातीला संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून घोषणा करण्यात आली होती.