संग्रहित छायाचित्र
कोची : स्टार फुटबॉलपटू अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी पुढील वर्षी एका आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी भारतात येणार आहे. अर्जेंटिना संघ पुढील वर्षी केरळमध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. यात मेस्सी सहभागी होईल.
केरळ सरकारच्या वतीने बुधवारी (दि. २०) ही घोषणा करण्यात आली. हा सामना जून किंवा जुलैमध्ये खेळवला जाईल. मात्र हा सामना कोणत्या संघाविरुद्ध खेळवला जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यापूर्वी मेस्सी २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यासाठी भारतात आला होता.
मेस्सीसह अर्जेंटिनाचा फुटबॉल संघ पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी राज्याला भेट देईल, असे केरळचे क्रीडामंत्री व्ही. अब्दुरहिमन यांनी सांगितले. मेस्सीसह अर्जेंटिना फुटबॉल संघ शेवटचा २०११ मध्ये व्हेनेझुएलाविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यासाठी भारतात आला होता. अर्जेंटिना आणि व्हेनेझुएला यांच्यातील हा सामना २ सप्टेंबर रोजी कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मेस्सीच्या सहाय्याने निकोलस ओटामेंडीने उत्तरार्धात हेडरवर गोल करत अर्जेंटिनाला १-० असा विजय मिळवून दिला होता.
अर्जेंटिना सध्याचा विश्वविजेता
अर्जेंटिना सध्याचा विश्वविजेता आहे. २०२२ मध्ये खेळल्या गेलेल्या फिफा विश्वचषक फायनलमध्ये पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा ४-२ असा पराभव करून संघाने विजेतेपद पटकावले. या विश्वविजेतेपदात मेस्सीचे योगदान मोलाचे ठरले होते. अर्जेंटिनाने यापूर्वी १९८६ मध्ये विजेतेपद पटकावले होते. अर्जेंटिनाचे हे एकूण तिसरे विजेतेपद ठरले. १९७८ मध्ये हा संघ प्रथमच विश्वविजेता ठरला होता.