संग्रहित छायाचित्र
मुंबई : बॉर्डर-गावस्कर करंडकाचा ज्वर शिगेला पोहोचला आहे. यंदा या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या वतीने धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर खेळताना दिसणार नाही. वॉर्नरने निवृत्ती स्वीकारल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या निवडसमितीला उस्मान ख्वाजाचा साथीदार कोण याचा शोध घ्यावा लागला. अनेक नावांमधून निवडसमितीने नॅथन मॅकस्विनीच्या नावाला पसंती दिली आहे.
२५ वर्षीय मॅकस्विनी ऑस्ट्रेलियातल्या साऊथ ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळतो. बिग बॅश स्पर्धेत त्याने मेलबर्न रेनेगेड्स आणि ब्रिस्बेन हिट संघांचं प्रतिनिधित्व केले आहे. २०२३-२४ हंगामात मॅकस्विनीने ४०.९४च्या सरीने धावा फटकावल्या. यामध्ये तीन शतकांचा समावेश होता. उत्तम क्षेत्ररक्षक असणारा मॅकस्विनी फिरकी गोलंदाजीही करतो. भारतीय अ संघाविरूद्धच्या पहिल्या सराव लढतीदरम्यान मॅकस्विीनीने चांगला खेळ करत निवडसमितीला दखल घेण्यास भाग पाडलं.
मॅकके इथे झालेल्या लढतीत मॅकस्विनीने ३९ आणि नाबाद ८८ धावांची खेळी केली. मेलबर्न इथे झालेल्या दुसऱ्या लढतीत त्याने १४ आणि २५ धावा केल्या. त्याने बिग बॅश स्पर्धेत ब्रिस्बेन हिट संघाचे नेतृत्वही केले आहे. वॉर्नरचा वारसदार म्हणून मार्कस हॅरिसला संधी मिळेल अशी शक्यता होती. सराव सामन्यात हॅरिस सहभागी झाला होता. मात्र भारतीय संघाच्या शेवटच्या दौऱ्यात भारतीय गोलंदाजांचा सामना करताना हॅरिसची त्रेधातिरपीट उडाली होती.
हॅरिसच्या बरोबरीने मॅट रेनशॉचे नावही चर्चेत होते. ऑस्ट्रेलियाच्या डोमेस्टिक स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला संधी मिळेल अशी शक्यताही होती. मात्र निवडसमितीने तुलनेने अनुनभवी अशा मॅकस्विनीला संधी देण्याचे निश्चित केले आहे. ३४ प्रथम श्रेणी सामन्यात मॅकस्विनीने ३८.१६च्या सरासरीने २५२२ धावा केल्या आहेत. यामध्ये ६ शतके आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण करणे स्वप्नवत असेल, असे मॅकस्विनीने म्हटले आहे. प्रतिस्पर्धी फलंदाजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या जसप्रीत बुमराहचे व्हीडीओ पाहून सराव करत असल्याचेही मॅकस्विनीने म्हटले आहे. भारतीय फिरकीपटूंचा सामना करणे आव्हानात्मक असेल असे त्याने सांगितले आहे. उस्मान ख्वाजासारखा अनुभवी साथीदार असल्यामुळे चिंता नसेल, असे मॅकस्विनीने सांगितले आहे.