'बुमरास्त्रा'मुळे कांगारू घायाळ
पर्थ : जगातील सर्वांत वेगवान खेळपट्टी असा लौकिक असलेल्या पर्थवर भारतीय फलंदाजांनी दाणादाण उडल्यानंतर जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच दिवशी यजमान ऑस्ट्रेलियाची अवस्था त्यापेक्षाही वाईट केली. यामुळे शुक्रवारी (दि. २२) पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बॉर्डर-गावसकर चषक मालिकेतील (Border-Gavaskar Trophy 2024-25) पहिल्या कसोटीत भारताच्या पहिल्या डावातील दीडशे धावांच्या उत्तरात कांगारू ७ बाद ६७ असा संघर्ष करीत होते.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करणाऱ्या भारताचा प्रारंभ चांगला झाला नाही. पन्नाशी गाठायच्या आत पाहुण्यांनी चार फलंदाज गमावले होते. मात्र, पहिली कसोटी खेळणाऱ्या नितीशकुमार रेड्डीने सर्वाधिक ४१ धावा करीत भारताला दीडशेचा टप्पा गाठून दिला. वृषभ पंतने ३७ तर केएल राहुलने २६ धावा करत भारताचा सावरण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियातर्फे वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने सर्वाधिक चार बळी घेतले. प्रत्युत्तरात बुमराहने चार, मोहम्मद सिराजने दोन तर पहिलीच कसोटी खेळणाऱ्या हर्षित राणाने एक विकेट घेत कांगारूंचे दात त्यांच्याच घशात घातले. यजमान संघ अद्यापही ८३ धावांनी मागे असून त्यांचे तीनच फलंदाज बाद व्हायचे बाकी आहेत. हे पाहता भारताला पहिल्या डावात आघाडी घेण्याची संधी आहे.
ऑप्टस स्टेडियमवर भारताने देवदत्त पडिक्कल, नितीशकुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांनी पदार्पणाची संधी दिली. भारताच्या डावात एकाही फलंदाजाला अर्धशतक नोंदवता आले नाही. रेड्डीने ५९ चेंडूंत सर्वाधिक ४१ धावा करताना १ षटकार आणि ६ चौकार लगावले. पंतने ७८ चेंडूंत ३७ धावा करताना १ षटकार आणि ३ चौकार लगावले. या दोघांनी सातव्या विकेटसाठी केलेली ४८ धावांची भागिदारी भारताच्या डावात सर्वोच्च ठरली. दिग्गज फलंदाज विराट कोहली (५) साफ अपयशी ठरला. त्याला हेझलवूडने बाद केले. सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि पडिक्कल यांना तर भोपळाही फोडता आला नाही.
फलंदाज अपयशी ठरले असले तरी भारताने गोलंदाजीत दमदार पुनरागमन केले आणि ऑस्ट्रेलियाला पहिल्या दिवशी बॅकफूटवर ढकलले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ॲलेक्स कॅरी १८ तर मिचेल स्टार्क ६ धावांवर खेळत होते. कॅरीव्यतिरिक्त ट्रॅव्हिस हेड (११) आणि नाथन मॅक्स्विनी (१०) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. उस्मकान ख्वाजा (८), स्टीव्ह स्मिथहह (०), कर्णधार पॅट कमिन्स (६) आणि नाथन मॅक्स्विनी (१) यांची शिकार बुमराहने केली. मार्नस लाबुशेन (२) आणि मेचेल मार्श (६) यांना सिराजने बाद केले. दिल्लीचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने अलीकडे नेहमीच भारताची डोकेदुखी ठरलेला ट्रॅव्हिस हेड (११) याला क्लीन बोल्ड करीत पहिला बळी नोंदवला.