विराट मंदावला...
#मुंबई
आयपीएल-१६ मध्ये स्टार फलंदाज विराट कोहली सातत्यपूर्ण फलंदाजी करीत आहे. त्याने आतापर्यंत ६ सामन्यांत चार अर्धशतके झळकावली असली तरी या दरम्यान स्ट्राईक रेट कमी असल्याने विराट संथ फलंदाजी करीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राॅयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा आधारस्तंभ असलेल्या ३४ वर्षीय विराटने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत ६ सामन्यांत ४७.५० च्या सरासरीने चार अर्धशतकांसह २७९ धावा फटकावल्या आहेत. यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी आहे. मात्र, स्ट्राईक रेट हा त्याच्यासाठी आणि संघासाठी चिंतेची बाब ठरत आहे. आतापर्यंतच्या सहा सामन्यांत त्याचा स्ट्राईक रेट १४२.३४ असा बऱ्यापैकी आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या ‘टाॅप टेन’ फलंदाजांमध्ये स्ट्राईक रेटच्या बाबतीत विराट आठव्या स्थानी येतो. शुभमन गिल (१३९.८७) आणि डेव्हीड वाॅर्नर (१२०.७६) यांचा स्ट्राईक रेट त्याच्यापेक्षा वाईट आहे. पाॅवर प्लेनंतर विराटची फलंदाजी संथ होत असल्याने संघाची धावसंख्या फुगत नाही.
आयपीएल जेतेपद मिळवण्यासाठी बंगलोर संघ गेल्या काही वर्षांपासून मेहनत घेत आहे. मात्र दरवर्षी त्यांच्या पदरी निराशाच पडते. यंदाही या संघानं मुंबई इंडियन्सला पराभूत करत चांगली सुरुवात केली. मात्र मधल्या सामन्यांमध्ये गाडी रुळावरून घसरली. त्यानंतर पंजाब किंग्जला पराभूत करत बंगलोर संघाची गाडी पुन्हा एकदा रुळावर आली आहे. यात विराटचे योगदान नि:संदिग्धपणे मोलाचे ठरले आहे. मागच्या सहापैकी चार सामन्यात विराट कोहलीने जबरदस्त खेळी केली. मुंबई इंडियन्स, लखनौ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स विरुद्ध त्याने अर्धशतकं झळकावली. मात्र असं असूनही विराट संघासाठी डोकेदुखी ठरत आहे.
विराटच्या स्ट्राईक रेटमुळे संघ अडचणीत आला आहे. खरं तर जेव्हा एखादा फलंदाज आऊट ऑफ फॉर्म असतो तेव्हा तो मोठे शॉट्स खेळत नाही किंवा त्याचा स्ट्राईक रेट कमी राहतो. मात्र विराटच्या बाबतीत असे नाही. फाॅर्मात असूनही त्याचा स्ट्राईक रेट चिंतेचा विषय ठरत आहे. सहा षटके संपली की विराटच्या फलंदाजीला खिळ लागते. त्यामुळे आरसीबीचं नुकसान होतं. त्यानंतर येणाऱ्या फलंदाजाला सेट होण्यास वेळ मिळत नाही आणि मोठे शॉट्स खेळावे लागतात.
या विचित्र परिस्थितीमुळे बंगलोरच्या मधल्या फळीच्या फलंदाजीवर ताण येतो. मोठी धावसंख्या उभारण्यासाठी आक्रमक खेळी करावी लागते. यामुळे अनेकदा फलंदाज चांगल्या फॉर्मात असूनही विकेट जाते. तसेच संघासाठी मोठी धावसंख्या उभारता येत नाही.
नेमकी अडचण अशी आहे...
विराट पॉवर प्लेमध्ये चांगली फलंदाजी करत खोऱ्याने धावा करत आहे. या दरम्यान तो कोणत्याही गोलंदाजाला न घाबरता डोळ्यांचे पारणे फेडणारे आक्रमक फटके लगावत धावा वसूल करतो. पण पॉवर प्ले संपल्यावर मात्र विराटची बॅट जणू म्यान होते. यंदाच नाही, तर गेल्या तीन वर्षांतील कामगिरीकडे पाहिल्यास ही बाब अधोरेखित होते. मागच्या तीन वर्षात विराट हा सातव्या, आठव्या आणि नवव्या षटकात सर्वात कमी स्ट्राईक रेट असलेला फलंदाज ठरला आहे.
विराट कोहलीने मागच्या तीन वर्षात सातव्या ते नवव्या षटकादरम्यान ९५ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. ही कामगिरी सर्वात खराब आहे. यानंतर केन विलियम्सन आणि वृद्धीमान साहा यांचा क्रम येतो. मागील तीन वर्षांत सातव्या ते नवव्या षटकांदरम्यान त्या दोघांचा स्ट्राईक रेट अनुक्रमे ९८.८८ आणि १०० असा आहे.
पॉवर प्ले संपल्यानंतर चेंडू स्पिनर्सकडे सोपवला जातो. त्यामुळे विराटची फलंदाजी धीमी होत असल्याचं दिसून आलं आहे. तो वेगवान गोलंदाजी फोडून काढत १९० च्या सरासरीने धावा करतो. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट १७० पेक्षा जास्त असतो. दुसरीकडे, स्पिनरविरुद्ध विराटची सरासरी २२.२५ अशी सामान्य असून स्ट्राईक रेट १०३ असा चिंताजनक आहे.
वृत्तसंस्था