विराटला फक्त आपल्या रेकाॅर्डची चिंता
#बंगलुरू
आयपीएलच्या १५ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध अवघ्या एका धावेने निसटता पराभव पत्करावा लागला. तीन सामन्यांतील त्यांचा हा दुसरा पराभव ठरला. समालोचकाच्या भूमिकेत असलेला न्यूझीलंडचा माजी खेळाडू सायमन डाऊलने आरसीबीच्या या पराभवासाठी विराटला जबाबदार धरले आहे. विराट केवळ स्वत:च्या रेकाॅर्डसाठी खेळतो, अशी टीका त्याने केली.
अनुभवी विराटने लखनौविरुद्ध अर्धशतक झळकावले, पण त्याचा संघ विजय मिळवू शकला नाही. विराटच्या अर्धशतकी खेळीचे विश्लेषण करताना डाऊल म्हणाला, ‘‘विराटने एक वेळ २५ चेंडूंत ४२ धावा केल्या होत्या. नंतर अर्धशतकासाठी आवश्यक पुढच्या ८ धावांसाठी त्याने १० चेंडू घेतले.’’ बंगलोरचा माजी कर्णधार असलेल्या विराटने ३५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
विराटची सुरुवात एखाद्या हायस्पीड ट्रेनसारखी झाली. तो वेगवान फटके मारत होता. नंतर ४२ वरून ५० पर्यंत पोहोचण्यासाठी त्याला १० चेंडू लागले. त्याला त्याच्या विक्रमाची काळजी वाटत होती. या खेळात अशा वागण्याला जागा आहे, असे मला वाटत नाही. तुमच्याकडे भरपूर विकेट शिल्लक असताना तुम्ही वेगाने धावा करायला हव्या, असे डाऊल म्हणाला.
या विजयासह लखनौचे चार सामन्यांतून ६ गुण झाले असून हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आला आहे. या सामन्यात बंगलोरकडून विराट कोहलीने ४४ चेंडूंत ६१, ग्लेन मॅक्सवेलने २९ चेंडूंत
५९ तर कर्णधार फाफ डुप्लेसिसने ४६ चेंडूंत नाबाद ७९ धावा केल्या. त्याचवेळी लखनौकडून मार्कस स्टॉयनिसने ३० चेंडूंत ६५ आणि निकोलस पूरनने १९ चेंडूंत ६२ धावा फटकावत विराट, फाफ आणि मॅक्सवेलच्या प्रयत्नांवर पाणी फेरले.
वृत्तसंस्था