संघाला न विचारताच पंचांनी घेतला चेंडू
#चेन्नई
आयपीएलमध्ये काही ना काही विचित्र गोष्टी, किस्से घडतच असतात. काही किस्से असे असतात ज्याने सगळ्यांच्या भुवया उंचावतात. कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून आयपीएलच्या सामन्यात वादंग निर्माण होणे तशी मोठी गोष्ट नाही. असाच एक वाद बुधवारी (१२ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्या सामन्यात झाला. या वादानंतर आता राजस्थान रॉयल्सचा दमदार ऑफस्पिनर आर अश्विनने पंचांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
आर. अश्विन म्हणाला की, राजस्थान रॉयल्स संघाला गोलंदाजीदरम्यान चेंडू बदलायचा नव्हता, पण पंचांनी तो स्वतः बदलला. पंचांनी संघाशी न बोलता स्वतःहून चेंडू बदलल्याच्या पंचांच्या निर्णयाने मला खूप आश्चर्य वाटत असल्याचे अश्विनने सांगितले. दव असल्यामुळे ओल्या चेंडूमुळे आम्हाला कोणतीही अडचण आली नाही, पण पंचांनी सांगितले की ते स्वतः परस्पर चेंडू बदलू शकतात. जास्त दव असताना पंचांनी स्वतः चेंडू बदलला, हे मी पहिल्यांदाच पाहिल्याचे अश्विनने स्पष्ट केले. आता जेव्हा जेव्हा दव पडेल तेव्हा पंच चेंडू बदलतील अशी मी आशा करतो. यंदाच्या आयपीएलमध्ये घेतलेल्या काही निर्णयांमुळे तो थोडा चकित झाला आहे.
वृत्तसंस्था