IPL : नव्या कर्णधाराने चमकवले नशीब

फलंदाजीत साफ अपयशी ठरला असला तरी विराट कोहलीने आपल्या नेतृत्वाखाली राॅयल चॅलेंजर्सला विजयपथावर आणताना सलग दुसरा सामना जिंकून दिला. आरसीबीने रविवारी (दि. २३) राजस्थान राॅयल्सला ७ धावांनी पराभूत करीत गुणतालिकेत पाचवे स्थान प्राप्त केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 24 Apr 2023
  • 03:49 pm
नव्या कर्णधाराने चमकवले नशीब

नव्या कर्णधाराने चमकवले नशीब

विराटच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा सलग दुसरा विजय, राजस्थानवर ७ धावांनी मात

#बंगळुरू  

फलंदाजीत साफ अपयशी ठरला असला तरी विराट कोहलीने आपल्या नेतृत्वाखाली राॅयल चॅलेंजर्सला विजयपथावर आणताना सलग दुसरा सामना जिंकून दिला. आरसीबीने रविवारी (दि. २३) राजस्थान राॅयल्सला ७ धावांनी पराभूत करीत गुणतालिकेत पाचवे स्थान प्राप्त केले.

बंगलोरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ९ बाद १८९ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. ग्लेन मॅक्सवेलने ४४ चेंडूंत ७७ धावा फटकावताना ४ षटकार आाणि ६ चौकार लगावले. नियमित कर्णधार असलेला पण या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणाऱ्या फाफ डुप्लेसिसने ३९ चेंडूंत २ षटकार आणि ८ चौकारांसह ६२ धावांची उपयुक्त खेळी केली. प्रत्युत्तरात, जोरदार प्रयत्न करूनही राजस्थानला २० षटकांत ६ बाद १८२ धावाच करता आल्या. या संघातर्फे इनम्पॅक्ट प्लेअर देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक ५२ धावा केल्या. अखेरच्या षटकांत ध्रुव जोरेल याने २ षटकार आणि २ चौकारांसह १६ चेंडूंत नाबाद ३४ धावांचा पाऊस पाडला. मात्र, अखेरच्या षटकात विजयासाठी २० धावा हव्या असताना आणि पहिल्या तीन चेंडूंत १० धावा वसूल झाल्यानंतरही हर्षल पटेलने नंतरचे ३ चेंडू अचूक टप्प्यावर टाकून ध्रुवचे प्रयत्न अपयशी ठरवले. हर्षलने आरसीबीतर्फे ३२ धावांत सर्वाधिक ३ बळी घेतले. ७७ धावा करणारा मॅक्सवेल सामनावीर ठरला.

प्रथम फलंदाजीला आलेल्या आरसीबीची सुरुवात वाईट झाली. पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ट्रेंट बोल्टने विराट कोहलीला शून्यावर पायचित केले. बोल्टनेच नंतर तिसऱ्या षटकात शाहबाज अहमदलाही (२) माघारी धाडले. तिसऱ्या षटकात २ बाद १२ अशी अवघड स्थिती असताना डुप्लेसिस-मॅक्सवेल यांनी आरसीबीला सावरले. या दोघांनी दोन फलंदाज लवकर बाद झाल्याचा कोणताही दबाव न घेता जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी तिसऱ्या गड्यासाठी ११.१ षटकांत १२७ धावांची भागिदारी  करीत आरसीबीला मोठ्या धावसंख्येकडे नेले. चौदाव्या षटकात फाफ धावबाद झाला. संदीप शर्माच्या षटकात यशस्वी जैस्वालने त्याला धावबाद केले. त्यानंतर मॅक्सवेलही पुढच्याच षटकात बाद झाला. यानंतर उर्वरित फलंदाजांना अपेक्षित वेगाने फलंदाजी करण्यात अपयश आल्याने आरसीबीला दोनशेचा टप्पा गाठता आला नाही. राजस्थानतर्फे ट्रेंट बोल्ट आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

विजयासाठी १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जोस बटलरला मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात शून्यावर बाद केले. यानंतर यशस्वी जैस्वाल आणि देवदत्त पडिक्कलने डाव सावरताना दुसऱ्या गड्यासाठी ११ षटकांत ९८ धावांची भागिदारी केली. पडिक्कल बाराव्या षटकात ५२ धावांवर (३४ चेंडूंत १ षटकार, ७ चौकार) बाद झाला. चौदाव्या षटकात यशस्वी जैस्वालही (४७ धावा, ३७ चेंडू, २ षटकार, ५ चौकार) परतला. हर्षल पटेलने त्याची विकेट घेतली. पटेलने नंतर कर्णधार संजू सॅमसनलाही (२२) बाद केले.  शिमरॉन हेटमायर (३) अपयशी ठरल्यावर अश्विनने ध्रुव जुरेलच्या साथीने डाव पुढे नेत राजस्थानच्या विजयाच्या आशा उंचावल्या. त्याने अखेरच्या षटकातील पहिल्या ३ चेंडूवर २ चौकारांसह १० धावा केल्या. मात्र हर्षल पटेलने पुढच्याच चेंडूवर अश्विनची (२१ धावा, ६ चेंडू, २ चौकार) विकेट घेत आरसीबीला सलग दुसरा विजय मिळवून दिला.  वृत्तसंस्था

संक्षिप्त धावफलक

राॅयल चॅलेंजर्स बंगलोर : २० षटकांत ९ बाद १८९  (ग्लेन मॅक्सवेल ७७, फाफ डुप्लेसिस ६२, दिनेश कार्तिक १६, ट्रेंट बोल्ट २/४१, संदीप शर्मा २/४९, युझवेंद्र चहल १/२८, रवीचंद्रन अश्विन १/३६) विवि राजस्थान राॅयल्स : २० षटकांत ६ बाद १८२ (देवदत्त पडिक्कल ५२, यशस्वी जयस्वाल ४७, ध्रुव जुरेल ३४, संजू सॅमसन २२, हर्षल पटेल ३/३२, डेव्हिड विली १/२६, मोहम्मद सिराज १/३९).

सामनावीर : ग्लेन मॅक्सवेल

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest