नाव मोठं, लक्षण खोटं!
#नवी दिल्ली
अनेक स्टार खेळाडू असूनही आयपीएल-१६ मध्ये नुकत्याच झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाला राॅयल चॅलेंजर्स बंगलोरकडून पराभव पत्करावा लागला. या मोसमात आतापर्यंत झालेल्या सामन्यांचा विचार करता पंजाब संघाकडून अष्टपैलू सॅम करनचे अपयश सर्वाधिक
लक्षवेधी ठरले आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक म्हणजे १८.५० कोटी रुपयांची बोली लागूनही अद्याप त्याला लय सापडलेली नाही.
गुरुवारी (दि. २०) झालेल्या सामन्यात आरसीबीने पंजाबवर २४ धावांनी सहज विजय मिळवला. पंजाबचा संघ सध्या ६ सामन्यांत ३ विजय आणि ३ पराभव अशा सामान्य कामगिरीसह गुणतालिकेत सातव्या स्थाानावर आहे. या दरम्यान करनने ६ सामन्यांत २०.१७ च्या सरासरीने फक्त ८७ धावा केल्या आहेत. यात नाबाद २६ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. गोलंदाजीतही करनला पाहिजे तसा सूर सापडलेला नाही. आतापर्यंत त्याला केवळ ५ बळी घेण्यात यश आले आहे. या दरम्यान ३१ धावांत ३ बळी ही लखनौ संघाविरुद्धची त्याची कामगिरी सर्वोत्तम ठरली आहे.
आयपीएल लिलावातील सर्व जुने रेकॉर्ड मोडत पंजाब किंग्सने इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करनला १८.५० कोटी रुपयांना विकत घेतलं. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बोली आहे. आयपीएलच्या इतिहासामधील सर्वात महागड्या खेळाडूकडून पंजाब किंग्सला चुना लावला गेला, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून देण्यात येत आहे. आरसीबीविरुद्ध पंजाबच्या पराभवानंतर भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागनंही सॅम करनच्या खेळण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
आरसीबीविरुद्धच्या सामन्यात करन वानिंदू हसरंगाकडून धावबाद झाला. या सामन्यात त्याला केवळ १० धावा करता आल्या. या सामन्यात निष्काळजीपणामुळे धावबाद झालेल्या करनवर सेहवागने तिखट शब्दांत टीका केली. ‘‘१८ कोटींमध्ये अनुभव विकत घेता येत नाही,’’ अशा शब्दांत वीरूने त्याला फटकारले.
वृत्तसंस्था