आयपीएलवर कोविडचे सावट
#मुंबई
इंडियन प्रीमियर लीगचे १६ वे सत्र दणक्यात सुरू होऊन काही दिवस लाेटत नाही, तोच आयपीएलच्या तमाम चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारताचा माजी कसोटीपटू आणि आता समालोचकाच्या भूमिकेत असलेल्या आकाश चोप्राला कोविडची लागण झाली आहे.
आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वीपासूनच देशात कोविडने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली होती. मात्र त्याचे प्रमाण कमी होते. आता महाराष्ट्रासह देशभरात हळूहळू कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच स्टार समालोचक असलेल्या आकाश चोप्रालाही या रोगाचा संसर्ग झाल्याने आयपीएल स्थगित तर होणार नाही ना, अशी भीती काही चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे. यापूर्वी २०२१ मध्ये कोविडमुळे आयपीएल स्पर्धा स्थगित करावी लागली होती. त्याप्रमाणे पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धा स्थगित करावी लागते की काय, असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहेत. सध्या अशा प्रकारची चिन्हे दिसत नसली तरी, देशात कोविडचा संसर्ग वाढल्यास मात्र स्पर्धेबाबत अनिश्चितता निर्माण होऊ शकते.
कोविडची लागण झाल्याची माहिती स्वत: आकाश चोप्रा याने दिली आहे. यूट्यूब चॅनेलच्या कम्युनिटी पोस्टवर त्याने याबाबतचा खुलासा केला. त्यामुळे काही दिवस आकाश चोप्रा समालोचन करताना दिसणार नाही. “कॉट अँड बोल्ड कोविड... या व्हायरसने पुन्हा एकदा हल्ला केला आहे. खूपच साधारण लक्षण आहे. सर्व काही नियंत्रणात आहे. काही दिवसांसाठी समालोचनापासून दूर असेन. त्यानंतर उत्साहपूर्वक पुनरागमन करेन, अशी आशा आहे’’ असं ट्वीट आकाश चोप्रा याने केलं आहे.
आकाश चोप्राने ऑक्टोबर २००२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. शेवटचा सामना ऑक्टोबर २००४ मध्ये खेळला होता. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आकाशने एकूण १० कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने दोन अर्धशतकांसह २३ च्या सरासरीने ४३७ धावा केल्या.
२०२१ मध्ये आयपीएलदरम्यान काही खेळाडूंना कोविडची लागण झाली होती. त्यानंतर ही लीग मध्येच स्थगित करण्यात आली होती. उर्वरित सामने संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळवण्यात आले होते. यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत फक्त सहा सामने खेळवण्यात आले आहेत. देशातील कोविडचा संसर्ग काळजी करण्याइतका नसल्याने बायोबबल नावाचा प्रकारही नाही. मात्र, हे संकट गहिरे झाले तर मग स्पर्धेबाबत अनिश्चितता निर्माण होईल.
यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट राईडर्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स हे १० संघ सहभागी झाले आहेत. सध्या साखळी फेरीचे सामने सुरू असून प्रत्येक संघाने आजघडीला किमान एक सामना खेळला आहे. २१ मे पर्यंत एकूण ७० सामने होतील. त्यानंतर प्लेऑफ आणि अंतिम फेरीच्या लढती रंगतील. लक्षणीय बाब म्हणजे, यंदाच्या प्लेऑफ आणि अंतिम फेरीबाबत अजूनही बीसीसीआयने अद्याप तारखा आणि स्थळ निश्चित केलेले नाही. वृत्तसंस्था