संग्रहित छायाचित्र
हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या जागतिक अॅथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेत 88.17 मीटर भालाफेक करुन भारताला जागतिक अॅथलेटीक्सचं पहिलं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रा याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.
2021 च्या टोकियो ऑलिंपिकमधल्या सुवर्णपदकानंतर, जागतिक अॅथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेतील नीरजची आजची सुवर्ण कामगिरी कोट्यवधी भारतीयांचा सन्मान वाढवणारी, भारतीय क्रीडाक्षेत्राला ऊर्जा देणारी, देशातील तरुण पिढीला खेळांकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देणरी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नीरज चोप्राच्या सुवर्ण कामगिरीचं कौतुक करुन त्याला पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
जागतिक अॅथलेटीक्स स्पर्धेत आतापर्यंत भारताला केवळ तीन पदकं मिळाली आहेत. 2003 मध्ये अंजू बॉबी जॉर्ज यांनी महिलांच्या लांब उडीत कांस्यपदक जिंकले होते. गेल्यावर्षी नीरजनं रौप्यपदक जिंकलं होतं. यंदा सुवर्णपदकाला गवसणी घालून नीरजनं देशासाठी जागतिक अॅथलेटीक्स स्पर्धेतलं पदकांचं वर्तूळ पूर्ण केलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नीरज चोप्राच्या सुवर्णकामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला.
याच स्पर्धेत भालाफेकपटू किशोर जाना याने 84.77 मीट भालाफेक करून पाचवे स्थान मिळविले आहे. भालाफेकपटू डी.पी. मनू याने 84.14 मीटरपर्यंत भालाफेक करून सहावे स्थान मिळविले आहे. या दोघांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले असून भविष्यातील चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.