गतविजेते गुजरात टाॅपवर!
#कोलकाता
अष्टपैलू विजय शंकरने झळकावलेले नाबाद आक्रमक अर्धशतक आणि सलामीवीर शुभम गिलच्या ४९ धावांच्या उपयोगी खेळीमुळे आयपीएलमध्ये शनिवारी (दि. २९) झालेल्या एकतर्फी सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर ७ गडी आणि १३ चेंडू राखून विजय मिळवला. या विजयासह गुजरात संघाने राजस्थान राॅयल्सला मागे टाकून १२ गुणांसह गुणतालिकेत अवव्ल स्थानी झेप घेतली आहे.
ईडन गार्डन्स स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १७९ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. यात सलामीवीर रहमानुल्ला गुरबाझ याने ३९ चेंडूंत सर्वाधिक ८१ धावांची वादळी खेळी केली. या दरम्यान त्याने ७ षटकार आणि ५ चौकारांची उधळण केली. त्याला आंद्रे रसेलचा (१९ चेंडूंत ३४ धावा, ३ षटकार, २ चौकार) इतर फलंदाजांकडून अपेक्षित साथ लाभली नाही. यामुळे एक वेळ दोनशेपार जाऊ पाहणारी कोलकात्याची धावसंख्या पावणेदोनशेच्या घरात मर्यादित राहिली. गुजराततर्फे मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ तर जोश लिटल आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. प्रत्युत्तरात, १७.५ षटकांत ३ बाद १८० धावा फटकावत गुजरातने सहज विजयाची नोंद केली. विजयने २४ चेंडूंत ५ षटकार आणि २ चौकारांसह नाबाद ५१ धावा केल्या. व्यंकटेश अय्यर (११) आणि कर्णधार नितीश राणा (४) या कोलकात्याच्या धडाकेबाज फलंदाजांना एकाच षटकात बाद करून त्यांच्या धावसंख्येला ब्रेक लावणारा जोश लिटल विजयाचा शिल्पकार ठरला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या कोलकात्यातर्फे गुरबाझने जोरदार फलंदाजी केली असली तरी त्याला आघाडीच्या इतर फलंदाजांकडून साथ लाभली नाही. नारायण जगदीशन (१९), शार्दुल ठाकूर (०), व्यंकटेश बय्यर (११), कर्णधार नितीश राणा (४) यांनी निराशा केली. गुरबाझ आणि आंद्रे रसेल यांनी पाचव्या गड्यासाठी केलेली ४७ धावांची भागिदारी या संघातर्फे सर्वोच्च ठरली.
गुजरातकडून शुभमनने आश्वासक फलंदाजी करीत विजयाचा पाया घातला. त्याने ३५ चेंडूंत ८ चौकारांसह ४९ धावांचे योगदान दिले. वृद्धिमान साहासह त्याने ४१ धावांची सलामी दिली. त्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याला (२० चेंडूंत २६ धावा) सोबत घेत शुभमनने दुसऱ्या गड्यासाठी ५० धावांची भर घातली. दोन धावांच्या अंतराने हार्दिक आणि शुभमन बाद झाल्यानंतर विजय शंकरने मॅच विनिंग खेळी केली. डेव्हिड मिलरने नाबाद ३२ धावा (१८ चेंडूंत २ षटकार, २ चौकार) करीत त्याला मोलाची साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद ८७ धावांची भागिदारी करीत गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
वृत्तसंस्था
संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स : २० षटकांत ७ बाद १७९ (रहमानुल्ला गुरबाझ ८१, आंद्रे रसेल ३४, नारायण जगदीशन १९, रिंकूसिंग १९, मोहम्मद शमी ३/३३, नूर अहमद २/२१, जोश लिटल २/२५) पराभूत वि. गुजरात टायटन्स : १७.५ षटकांत ३ बाद १८० (विजय शंकर नाबाद ५१, शुभमन गिल ४९, डेव्हिड मिलर ३२, हार्दिक पंड्या २६, सुनील नरेन १/२४, हर्षित राणा १/२५, आंद्रे रसेल १/२९).
सामनावीर : जोश लिटल.