आयपीएलमधील स्टंपची किंमत रहाणेच्या करार रकमेपेक्षा जास्त
#मुंबई
आयपीएलचा सोळावा हंगाम रंगतदार टप्प्यावर आला आहे. प्ले ऑफकरिता पात्र ठरण्यासाठी संघांची धडपड सुरू आहे. प्रत्येक सामन्यादरम्यान लक्ष वेधून घेणाऱ्या स्टंपबाबत अनेकांना उत्सुकता आहे. एका सामन्यासाठी आवश्यक असलेल्या स्टंपच्या दोन संचांची किंमत ही ५० ते ७० लाख रुपयांच्या घरात आहे. तुलनेपुरते सांगायचे झाल्यास, दिग्गज अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेला लाभलेल्या ५० लाख रुपयांच्या करार रकमेपेक्षा स्टंपची किंमत जास्त आहे.
हे एलईडी स्टंप दिसायला जरी साध्या स्टंपप्रमाणे दिसत असले, तरी त्याची किंमत खूप जास्त आहे. अनेक खेळाडूंच्या आयपीएलमधील कराराच्या रकमेपेक्षा हे स्टंप महागडे आहेत. इतकंच नाही, तर या स्टंपची किंमत 'प्लेअर ऑफ द मॅच'च्या बक्षीस रकमेपेक्षा ५० ते ७० पट जास्त आहे.
एलईडी स्टंपची किंमत विविध देशांमध्ये वेगवेगळी आहे. त्यामुळे काही देशांमध्ये त्यांच्या किमतीत थोडा फरक दिसून येतो. आयपीएलमध्येही हेच एलईडी स्टंप वापरले जातात. आयपीएलमध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांच्यासोबत ५० लाख वा त्यापेक्षा कमी रकमेचा करार करण्यात आला आहे. यात अजिंक्य रहाणेसारख्या दिग्गज फलंदाजाचाही समावेश आहे. अजिंक्य या मोसमात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. अशा स्थितीत स्टंपची किंमत एखाद्या खेळाडूच्या वर्षभराच्या आयपीएल करार रकमेपेक्षा जास्त असणे, हे अनेकांना अविश्वसनीय वाटत असले तरी ते खरे आहे.
वृत्तसंस्था