लेकाला खेळताना पाहून सचिनच्या डोळ्यांत पाणी
#हैदराबाद
यजमान हैदराबाद सनरायझर्सविरुद्ध मुंबई इंडियन्सकडून आपल्या मुलाला अर्जुनला गोलंदाजी करताना पाहून महान फलंदाज सचिन तेंडुलकर भावनिक झाला आणि त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले होते.
हैदराबाद आणि मुंबई यांच्यात मंगळवारी (दि. १७) हा सामना झाला. यात मुंबई संघाने १४ धावांनी बाजी मारली. अर्जुनची आयपीएलमधील ही दुसरी लढत होती. यात त्याने भुवनेश्वरकुमारला बाद करून आपला पहिला बळीदेखील नोंदवला. या सामन्यात अर्जुनने प्रभावी गोलंदाजी करताना २.५ षटकांत १८ धावा देत एक बळी घेतला. यावेळी समालेचन करीत असलेला वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज इयान बिशपने ड्रेसिंग रूममध्ये काय झालं, याची माहिती दिली. ‘‘अर्जुन आयपीएल खेळत असल्याने सचिन आनंदी दिसत होता. त्यावेळी त्याच्या डोळ्यात पाणीदेखील आले होते,’’ असे तो म्हणाला.
‘‘अर्जुनला मी पहिल्यांदा स्क्रीनवर पाहिलं, तेव्हा मला नक्कीच आनंद झाला. मी २००८ मध्ये मुंबई इंडियन्स संघाशी जोडलो गेलो, आता अर्जुन याच संघासाठी खेळतोय, असो सांगताना सचिन भावूक झाला होता.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात अर्जुनने २ षटके गोलंदाजी करताना १७ धावा दिल्या. या सामन्यात त्याला बळी मिळवता आला नव्हता. हैदराबादविरुद्ध अर्जुननने महत्त्वाची शेवटची ओव्हर टाकली आणि मुंबईला विजय मिळवून दिला. हैदराबादला या षटकात विजयासाठी २० धावांची गरज होती आणि त्यांच्याकडे दोन फलंदाज शिल्लक होते. मात्र, अर्जुनने या निर्णायक षटकात टिच्चून मारा करीत केवळ ५ धावा देत हैदराबादचा डाव संपवला. यादरम्यान त्याने भूवीला (२) बाद केले तर अब्दुल समद (९) धावबाद झाला.
वृत्तसंस्था