संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध ०-३ने सपाटून मार खाल्ल्यानंतर भारतीय खेळाडूंबरोबरच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवरही टीका करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी आगामी कसोटी मालिका ही गंभीरच्या संयमाची तसेच प्रशिक्षकपदाची परीक्षा बघणारी असेल, असे मत त्याचा सहकारी असलेला भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजनसिंगने व्यक्त केली.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर मालिकेला .२२ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. ही मालिका टीम इंडियासोबतच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचं भविष्य ठरवेल. न्यूझीलंडविरुद्ध व्हाईटवॉश झाल्यानंतर, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघानं चांगली कामगिरी केली नाही तर गंभीरकडून कसोटी संघाचं प्रशिक्षकपद काढून घेतलं जाऊ शकतं, अशी चर्चा सुरू झाली आहे. काही वृत्तांमध्ये असाही दावा करण्यात आला होता की, गंभीर आणि संघातील वरिष्ठ सदस्यांमध्ये काही बाबतीत एकमत नव्हतं. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया दौरा गंभीरसाठी खूप महत्त्वाचा आहे. दरम्यान, माजी फिरकीपटू भज्जी गंभीरच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. तो म्हणाला, ‘‘गंभीर नेहमी संघाच्या भल्याचा विचार करतो. त्याला एवढ्या लवकर जज करणं चुकीचं आहे. त्याला थोडा वेळ द्यायला हवा. मोठ्या संघांना चालवणं एवढं सोपं काम नसतं. ही मालिका चांगली गेली नाही, तर त्याचे परिणाम गंभीरला भोगावे लागतील.’’
एका यूट्यूब चॅनलवर भज्जीने न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवासाठी गंभीरला जबाबदार धरणे योग्य नसल्याचे सांगितले. “गौतम गंभीर जेव्हापासून प्रशिक्षक झाला तेव्हापासून तो ना फलंदाजीला आला ना गोलंदाजीलाही गेला. कारण ते त्याचं काम नाही. तो अचानक प्रशिक्षक झाला आणि निकाल खराब यायला लागले, असेही काही झालेले नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवासाठी सर्वस्वी त्याला दोष देणे अयोग्य आहे. संघव्यवस्थापनाची योजना फिरकीला अनुकूल खेळपट्टी बनवण्याची होती, मात्र ती त्यांच्यावरच उलटली,” असे भज्जी म्हणाला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची आगामी पाच सामन्यांची मालिका ही गंभीरच्या संयमाची आणि रागाची परीक्षा असेल, असे नमूद करून ४४ वर्षीय हरभजन पुढे म्हणाला, ‘‘मोठे संघ चालवणं कठीण आहे. प्रत्येक गोष्टीसाठी वेळ लागतो. जर निकाल चांगले आले तर प्रत्येकजण म्हणेल, बघा, गौतम संघाला विजय मिळवून देतो. गंभीरला ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. त्याला रागावर नियंत्रण ठेवून संयम बाळगावा लागेल. तो सध्या रडारवर आहे. जर मालिका चांगली गेली नाही, तर त्याचे परिणाम गंभीरला भोगावे लागतील. त्यानं फक्त शांत राहावं आणि संघाला चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित करावे, अशी माझी इच्छा आहे.’’
दोन्ही संघांना फिप्टी-फिप्टी चान्स
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होण्यास काही दिवस शिल्लक असताना हरभजनने ही मालिका जिंकण्याची दोन्ही संघांना फिप्टी-फिप्टी संधी असल्याचे मत व्यक्त केले. हरभजन म्हणाला, ‘‘ऑस्ट्रेलियातील परिस्थिती घरच्या परिस्थितीपेक्षा वेगळी असल्याने भारतीय फलंदाजांची फारशी चिंता नाही. टीम इंडिया पुन्हा एकदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकण्याची शक्यता ५० टक्के आहे. मी भारताने अलीकडे खेळलेल्या क्रिकेटचा विचार करत नाही, कारण येथील परिस्थितीत वेगळी होती. चांगल्या फलंदाजाकडे पाहूनदेखील असे वाटत होते की त्यांना फलंदाजी कशी करावी हे माहित नाही. न्यूझीलंडविरुद्ध मालिका गमावल्यामुळे संघाचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. पण ऑस्ट्रेलियातील परिस्थिती घरच्या परिस्थितीपेक्षा वेगळी असल्याने भारतीय फलंदाजांनी त्याची फारशी चिंता करू नये. तेथे खेळपट्ट्या चांगल्या असतील.’’
आपल्याला पुजारासारख्या खेळाडूची गरज आहे, जो खेळपट्टीवर टिकू शकेल आणि चेंडूला जुना करेल. मागील मालिकेतील अपयशामुळे केएल राहुलवर खूप टीका झाली आहे, पण तो चांगला खेळाडू आहे. घरच्या मैदानावर खेळत असल्याने या मालिकेत ऑस्ट्रेलियाला भारतापेक्षा जास्त संधी असेल. पहिली कसोटी खूप महत्त्वाची असेल. भारताने पर्थमध्ये चांगली सुरुवात केली, तर मालिका चुरशीची होईल. मात्र सुरुवात चांगली झाली नाही, तर भारतासाठी अडचणी वाढतील, याची जाणीवही हरभजनने करून दिली.