रोहितने आपले नाव ‘नो-हिट’ ठेवावे
#चेन्नई
आपल्या जबरदस्त फटकेबाजीमुळे चाहत्यांकडून ‘रोहिट’ हे टोपणनाव मिळालेला मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएलच्या या मोसमात अद्याप पाहिजे तशी चमक दाखवू शकलेला नाही. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शनिवारी (दि. ६) तर तो शून्यावर बाद झाला. त्यामुळे रोहितने आपले नाव आता ‘नो-हिट’ ठेवावे, अशी बोचरी टीका भारताचे माजी धडाकेबाज फलंदाज के. श्रीकांत यांनी केली.
गेल्या काही सामन्यांत धावा करण्यात अपयशी ठरलेला रोहित चेन्नईविरुद्धच्या सामन्यात फ्लॉप ठरला. त्याच्या बॅटमधून धावा जणू आटल्या आहेत. त्यामुळे रोहित क्रिकेट विश्लेषकांच्या रडारवर आला आहे. २२ एप्रिलला पंजाब किंग्जविरुद्ध रोहितने ४४ धावा केल्या. त्यानंतर चार इनिंगमध्ये त्याने फक्त ५ धावा केल्या आहेत. सीएसकेविरुद्ध रोहित शून्यावर बाद झाल्यानंतर समालोचनादरम्यान श्रीकांत यांनी बोचरी टीका केली. ते म्हणाले, “रोहितने त्याचं नाव बदलून ‘नो-हिट’ शर्मा करून घ्यावं. मी मुंबई इंडियन्सचा कॅप्टन असतो, तर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येसुद्धा स्थान दिलं नसतं.”
मुंबईच्या डावात तिसऱ्या ओव्हरमध्ये रोहित शर्मा आऊट झाला. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने रचलेल्या सापडळ्यात तो अलगद अडकला. दीपक चाहरच्या गोलंदाजीवर धोनी स्टम्पच्या जवळ उभा राहिला. स्लोअर वन चेंडूवर रोहितने लॅप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण भोपळा फोडण्यापूर्वीच तो गलीत रवींद्र जाडेजाकडे सोपा झेल देऊन बाद झाला. या सामन्यात चेन्नईने मुंबईवर सहा गडी राखून विजय मिळवला. मुंबईने विजयासाठी दिलेले १४० धावांचे आव्हान चेन्नईने १७.४ षटकांत आरामात पार केले.
आयपीएलच्या सलग दुसऱ्या मोसमात रोहितचा संघर्ष सुरू आहे. यंदा त्याची सरासरी २० पेक्षा कमी आहे. मागील वर्षी त्याने त्याने १४ सामन्यांत २६८ धावा केल्या. मुंबई इंडियन्सला मागील सत्र कधी लक्षात ठेवायलाही आवडणार नाही. कारण त्यावेळी पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्सची टीम तळाला होती. मागच्या सीजनमध्ये कर्णधार रोहितची सरासरी १९.१४ अशी वाईट होती. त्यात एकही अर्धशतक नव्हतं. यंदा रोहितला केवळ एक अर्धशतक झळकावता आले आहे. आतापर्यंत त्याला १० सामन्यांत १८.४० च्या सरासरीने केवळ १८४ धावा करता आल्या आहेत. या दरम्यान तो दोनदा शून्यावर बाद झाला. रोहित अातापार्यंत सोळा वेळा शून्यावर आऊट
आयपीएल करीअरमध्ये रोहित शर्माची शून्यावर बाद होण्याची ही १६ वी वेळ आहे. याबाबतीत त्याने दिनेश कार्तिक, मनदीपसिंग आणि सुनील नरेन यांना मागे टाकले आहे. कर्णधार म्हणून खेळताना तब्बल ११ वेळा शून्यावर बाद होण्याची निराशाजनक कामगिरीदेखील रोहितच्या नावे नोंदली गेली आहे.
वृत्तसंस्था