रिंकूने गुजरातला रडवले!
#अहमदाबाद
अखेरच्या षटकात विजयासाठी २९ धावांची गरज असताना रिंकूसिंगने अविश्वसनीय फटकेबाजी करताना अखेरच्या पाच चेंडूंवर सलग पाच षटकार लगावत गतविजेत्या गुजरात टायटन्सविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघाला रविवारी (दि. ९) संस्मरणीय विजय मिळवून दिला. २५ वर्षीय रिंकूने केलेल्या ‘न भूतो’ फटकेबाजीमुळे राशिद खानने १७व्या षटकात धेतलेली शानदार हॅट्ट्रकदेखील अपयशी ठरली.
प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २०४ अशी भक्कम धावसंख्या उभारूनदेखील गुजरात संघाला नरेंद्र मोदी स्टेडियम या आपल्या घरच्या मैदानावर अटीतटीच्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. २० षटकांत ७ बाद २०७ धावा फटकावत कोलकाता संघाने या स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवला. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी ४ धावांची गरज असताना डावखुऱ्या रिंकूने ऑफ स्टंपबाहेरील चेंडूला लाॅंग ऑन सीमारेषेबाहेर भिरकावत आपल्या संघाचा विजय साकारला. २१ चेंडूंत ६ षटकार आणि एका चौकारासह २२८.५७च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने नाबाद ४८ धावांचा पाऊस पाडणारा रिंकू अर्थातच विजयाचा शिल्पकार ठरला.
विजयासाठी २०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या कोलकात्याचा प्रारंभ चांगला झाला नाही. चार षटकांत अवघ्या २८ धावांवर त्यांनी सलामी जोडी गमावली. त्यानंतर व्यंकटेश अय्यर आणि कर्णधार नितीश राणा यांनी तिसऱ्या गड्यासाठी ९.१ षटकांत १०० धावांची वेगवान भागिदारी करीत कोलकात्याला विजयाच्या मार्गावर आणले. राणाने २९ चेंडूंत ४५ धावा फटकावताना ३ षटकार आणि ४ चौकार लगावले. संघाला दीडशेचा टप्पा ओलांडून दिल्यानंतर अय्यरही परतला. त्याने ४० चेंडूंत ५ षटकार आणि ८ चौकारांसह ८३ धावांची वेगवान खेळी केली. या दोघांनाही अल्झारी जोसेफने बाद केले.
सामना कोलकात्याच्या ताब्यात असतानाच फिरकीपटू राशिदने आंद्रे रसेल (१), सुनील नरेन (०) आणि शार्दुल ठाकूर (०) या तीन धोकादायक फलंदाजांना १७व्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर बाद करीत हॅट्िट्रक साधली. यामुळे ४ बाद १५४ वरून कोलकात्याची अवस्था ७ बाद १५५ अशी झाली. या क्षणी गुजरातचा विजय निश्चित वाटत होता. मात्र रिंकूचे इरादे काही वेगळेच होते. त्याने प्रारंभीचे काही चेंडू शांतपणे खेळून काढले आणि नंतर अखेरच्या दोन षटकांत टाॅप गिअर टाकला.
कोलकात्याला अखेरच्या दोन षटकांत विजयासाठी ४३ धावांची गरज होती. जोश लिटलने टाकलेल्या १९व्या षटकात एक षटकार आणि एका चौकारासह रिंकू-उमेश यादव जोडीने १४ धावा घेतल्या. अखेरच्या षटकात विजयासाठी २९ धावांची गरज असताना यश दयालच्या पहिल्या चेंडूवर एक धाव घेत उमेशने रिंकूला स्ट्राईक दिली. त्यानंतर मात्र सूसाट सुटलेल्या रिंकूने गुजरातला त्यांच्या घरच्या मैदानावर अनेक वर्षे स्मरणात राहणारा पराभव पत्करायला भाग पाडले. अखेरच्या षटकातील ३१ धावांमुळे यश दयालच्या ४ षटकांत तब्बल ६९ धावांची नोंद झाली.
तत्पूर्वी, अष्टपैलू विजय शंकरने वादळी खेळी करीत अवघ्या २४ चेंडूंत झळकावलेल्या नाबाद ६३ धावांमुळे गुजरातने दोनशेपार मजल मारली. त्याने आपल्या खेळीत ५ षटकार आणि ४ चौकार लगावले. साई सुदर्शनने त्याला चांगली साथ देताना ३८ चेंडूंत २ षटकार आणि ३ चौकारांसह ५३ धावा केल्या. कोलकात्यातर्फे सुनील नरेनने प्रभावी गोलंदाजी करताना ३३ धावांत ३ बळी घेतले. वृत्तसंस्था
संक्षिप्त धावफलक :
गुजरात टायटन्स : २० षटकांत ४ बाद २०४ (विजय शंकर नाबाद ६३, साई सुदर्शन ५३, शुभमन गिल ३९, वृद्धिमान साहा १७, सुनील नरेन ३/३३, सुयश शर्मा १/३५) पराभूत वि. कोलकाता नाईट रायडर्स : २० षटकांत ७ बाद २०७ (व्यंकटेश अय्यर ८३, रिंकूसिंग नाबाद ४८, नितीश राणा ४५, राशिद खान ३:२७, अल्झारी जोसेफ २/२७, मोहम्मद शमी १/२८, जोश लिटल १/४५).
सामनावीर : रिंकूसिंग.