राहुल इन सूर्या आऊट?
#नवी दिल्ली
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून (१७ फेब्रुवारी) दिल्लीत खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघात काही बदल केला जाण्याची शक्यता आहे. मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर तंदुरुस्त झाला असून संघात त्याचे पुनरागमन निश्चित असल्याचे मानले जात आहे. केएल राहुलसाठी सूर्यकुमार यादवला संघाबाहेर ठेवले जाणार असल्याची चर्चा आहे.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये टीम इंडिया १-० ने पुढे आहे. नागपूर येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने एक डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला. आता भारतीय संघाची नजर दुसरी कसोटी जिंकून मालिकेत अजिंक्य आघाडी मिळविण्यावर असेल. दिल्ली कसोटीत प्लेइंग-११ मध्ये काही बदल पाहायला मिळू शकतात. मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर तंदुरुस्त झाला असून प्लेइंग-११ मध्ये त्याचे पुनरागमन निश्चित असल्याचे मानले जात आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले की, श्रेयस जर पाच दिवस भार सहन करणार असेल तर तो पुनरागमन करू शकेल. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर श्रेयसचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. बांगलादेशमधील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान त्याला पाठीच्या खालच्या भागात दुखापत झाली होती. अय्यर परतला तर सूर्यकुमार यादवला बाहेर बसावे लागेल. सूर्यकुमार यादवने नागपुरात पदार्पण केले आहे. पहिल्या डावात त्याने आठ धावा केल्या. अय्यर खेळत नसताना त्याला संधी मिळाली. कसोटी सामन्यांमध्ये श्रेयसचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे.
त्याने सात सामन्यांत ५६.७३ च्या सरासरीने ६२४ धावा केल्या आहेत. या दरम्यान अय्यरने एक शतक तर पाच अर्धशतकेही झळकावली आहेत.
वृत्तसंंस्था