विराटच्या संथ फलंदाजीवर प्रश्नचिन्ह
# नवी दिल्ली
विराट कोहलीने आयपीएल-१६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात ४६ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. अलीकडे तो करीत असलेल्या अशा प्रकारच्या फलंदाजीवर माजी दिग्गज क्रिकेटपटू रिकी पाॅंटिंगसह अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
विराटच्या अर्धशतकानंतरही या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला पराभवाला सामोरे जावे लागले. फिल सॉल्टच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीने २० चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकला. बंगलोर संघाची मधली फळी चांगली कामगिरी करत नाही. अशा परिस्थितीत विराटची शेवटपर्यंत टिकून राहण्याची योजना योग्य मानली जाऊ शकते, परंतु यासाठी संघाला किमान २० धावांचा फटका सहन करावा लागतो.
दिल्लीविरुद्ध विराटने पहिल्या १८ चेंडूत केवळ १९ धावा केल्या. पाॅवर प्लेमध्ये संघांना चांगली धावसंख्या उभारायची असेल, तर आघाडीच्या खेळाडूंना आक्रमक फलंदाजी करावी लागते. विराट येथे कमी पडतो. दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी या हंगामाच्या सुरुवातीला टी-२० मध्ये अँकरच्या
भूमिकेवर शंका व्यक्त केली होती. अशा स्थितीत डावाचे नेतृत्व करणाऱ्या फलंदाजांची भूमिका दुय्यम ठरते. ऑस्ट्रेलियाचा हा माजी कर्णधार म्हणाला होता की, ‘‘मला विश्वास आहे की, जर तुमच्याकडे आक्रमक आणि ताकदवान फलंदाज असतील तर ते अँकरची भूमिका बजावण्यासाठी त्यांचा खेळ बदलू शकतात, पण डाव सांभाळण्याची भूमिका बजावू शकणारा फलंदाज २०० च्या स्ट्राइक रेटने धावा करेलच असे नाही. या वर्षी जर धावा करण्यात सक्षम कोणी खेळाडू असेल तर तो अजिंक्य रहाणे आहे.’’
वृत्तसंस्था