भांडणे खेळाडूंची, भुर्दंड मात्र संघाला
#नवी दिल्ली
फलंदाज विराट कोहली आणि माजी सलामीवीर गौतम गंभीर या दिल्लीकर खेळाडूंमध्ये नव्याने वाद उद्भवलेल्या वादाचा फटका संघाला बसला आहे. कारण या वादापोटी त्यांना ठोठावण्यात आलेल्या दंडाची वसुली त्यांच्या संघांकडून केली जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स या संघांमध्ये सोमवारी (१ मे) झालेल्या आयपीएल सामन्यानंतर कोहली आणि गंभीर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या वागणुकीमुळे त्यांच्याकडून सामन्याचे संपूर्ण मानधन दंडाच्या स्वरूपात आकारले जाणार होते. पण, ठोठावण्यात आलेला पूर्ण दंड त्यांच्या संघाकडून आकारला जाणार असल्याचे समोर आले आहे.
सोमवारी लखनौचे फलंदाज बाद झाल्यानंतर कोहली आक्रमक पद्धतीने जल्लोष करताना दिसला. तसेच, सामन्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू हस्तांदोलन करत असताना कोहली आणि लखनौचा गोलंदाज नवीन-उल-हक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. मग बंगळुरूच्या ग्लेन मॅक्सवेलने मध्यस्थी करत हा वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कोहली लखनौचा सलामीवीर काएल मेयर्सशी संवाद साधत होता. तेव्हा गंभीरने मेयर्सला दूर केले. मग गंभीर रागाने कोहलीजवळ गेला. लखनौचा कर्णधार केएल राहुल आणि अन्य खेळाडूंनी गंभीरला रोखण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा फारसा फायदा झाला नाही. गंभीर आणि कोहली यांच्यात वाद झाला. या दोघांनी ‘आयपीएल’च्या आचारसंहितेतील कलम २.२१ चे उल्लंघन केले. त्या प्रकरणी कोहली आणि गंभीर या दोघांकडून सामन्याचे संपूर्ण मानधन दंडाच्या स्वरूपात आकारले जाणार होते. नवीन-उल-हकला सामन्याच्या मानधनातील ५० टक्के दंड ठोठावण्यात आला होता. मात्र, कोहली आणि गंभीर यांच्या दंडाची रक्कम त्यांच्या संघाकडून वसूल केली जाणार आहे.
असा वसूल करतात दंड
विराट कोहली आरसीबीच्या संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. आयपीएलमध्ये खेळाडूंवर लावण्यात आलेल्या दंडाची रक्कम आरसीबीचा संघ भरतो. त्याशिवाय नवीन उल हक आणि गौतम गंभीर यांना झालेला दंड लखनौचा संघ भरणार आहे. खेळाडू मैदानावर जे काही करतात ते संघासाठी करतात. त्यामुळे फ्रेंचाइझी खेळाडूंना व्यक्तिगत खर्च करू देत नाहीत. त्यामुळे खेळाडूंना लावण्यात आलेला दंड फ्रेंचायझी स्वत: भरते. वेगवेगळ्या फ्रेंचाइझीचे दंड भरण्याचे नियम वेगवेगळे असू शकतात, पण आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक फ्रेंचायझीने आपल्या खेळाडूंचा दंड स्वतः भरला आहे. म्हणजेच खेळाडूंवर कोणताही आर्थिक बोजा येऊ दिला जात नाही. दरम्यान, प्रत्येक खेळाडू, कर्णधार प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूसोबत भिडत असतो, तेव्हा आपल्या संघासाठी तो जिवाचे रान करत असतो. त्यामुळेच खेळाडूंना झालेला दंड फ्रेंचाइझी भरत असते. प्रत्येक हंगामाच्या अखेरीस बीसीसीआयकडून प्रत्येक संघाला एक लेखी पत्र पाठवले जाते, त्यामध्ये फ्रेंचाइझीमधील खेळाडूंना लावण्यात आलेल्या दंडाची माहिती असते.फ्रेंचाइझी ती माहिती खेळाडूंनाही कळवू शकते, तो निर्णय त्यांचा असतो, पण संघ खेळाडूवर आर्थिक भार येऊ नये, म्हणून रक्कम स्वतः भरतात.
असा ठरतो दंड
विराट कोहलीला एका हंगामासाठी १५ कोटी रुपयांचे मानधन मिळते. जर त्याचा आरसीबी संघ प्लेऑफमध्ये नाही पोहचला तर विराट कोहली १४ सामने खेळतो. म्हणजेच विराट कोहली प्रत्येक सामन्याला १.०७ कोटी रुपये मानधन घेतो. जर त्याचा संघ फायनलपर्यंत पोहचला तर त्यानुसार एकूण सामने आणि एकूण रक्कम यातून मानधनाची रक्कम ठरवली जाते. आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर आर्थिक दंडाची रक्कम ठरवली जाते. त्यानुसार फ्रेंचाइझीला लेखी पत्र पाठवले जाते.