सपना गिल प्रकरणी पृथ्वी शॉला धक्का
#मुंबई
सेलिब्रेटींमधील छोटासा वादही खूप दिवस प्रकाशझोतात राहतो. अलीकडे सोशल मीडियामुळे अशा वादाला फोडणी दिली जाते आणि हे विषय बराच काळ चर्चेत राहतात. असाच चर्चेतला वाद म्हणजे क्रिकेटर पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इन्फ्लुन्सर सपना गिल या दोघांमधील आहे. या दोघांत झालेल्या वादानंतर पृथ्वी शॉने केलेल्या तक्रारीने अडचणीत आलेल्या सपना गिलने थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच आपल्या विरोधातील दाखल गुन्हा रद्द करावा, अशी मागणी तिने केली होती. या मागणीची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली असून क्रिकेटर पृथ्वी शॉसह फिर्यादी आणि तपास अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. तसेच या प्रकरणी उत्तर सादर करावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
मुंबईच्या एका पबमध्ये भांडण झालेले हे प्रकरण आहे. सपना गिलने पृथ्वी शॉ सोबत हुज्जत घातल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. याच प्रकरणात ओशिवरा पोलीस ठाण्यात सपना गिल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता हाच गुन्हा रद्द करण्यासाठी सपना गिलने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. विशेष म्हणजे सपना गिलने, अंधेरी महानगर कोर्टातही पृथ्वी आणि पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी देखील याचिका दाखल केली आहे.
वृत्तसंस्था