सूर्या, राणा-शौकीन यांना दंड
#मुंबई
आयपीएलमध्ये पहिल्यांदाच नेतृत्व करण्याची संधी लाभलेला सूर्यकुमार यादव तसेच नितीश राणा आणि हृतिक शौकीन या तिघांना मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यात नियम मोडल्याप्रकरणी मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.
वानखेडे स्टेडियमवर रविवारी (दि. १६) झालेल्या या सामन्यात सूर्याला प्रथमच मुंबईचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. यात त्याने स्वत:देखील फलंदाजीत उपयुक्त योगदान देत मुंबईला सहज विजय मिळवून दिला. मात्र, स्लो ओव्हर रेटमुळे त्याला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला.
कोलकाताविरुद्ध मुंबई संघाने गोलंदाजी करताना निर्धारित वेळेपेक्षा जास्त अवधी घेतला. यामुळे परिणामी मुंबई इंडियन्सला आयपीएलने नेमून दिलेल्या वेळेत षटके टाकता आली नाहीत. कर्णधार म्हणून यासाठी नियमानुसार सूर्याला जबाबादार ठरवण्यात आले. सामन्यानंतर आयपीएल समितीने मुंबईचा कर्णधार सूर्यकुमारला दंड ठोठावला.
या सामन्यादरम्यान कोलकात्याचा कर्णधार नितीश राणा आणि मुंबईचा गोलंदाज शौकीन यांच्यात वाद झाला. यामुळे नितीशच्या मानधनाच्या २५ टक्के आणि शौकीनच्या मानधनाच्या १० टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला. शौकीनने केकेआरच्या नितीश राणाला बाद केल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. भरमैदानात दोन्ही खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. यामुळे त्यांना हा दंड ठोठावण्यात आला.
वृत्तसंस्था