ओल्ड इज गोल्ड!
#नवी दिल्ली
टी-२० क्रिकेट हा तरुण खेळाडूंचा फॉर्मेट मानला जातो. पण यात अनुभवदेखील महत्त्वाचा असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. ईशांत शर्मा, अमित मिश्रा आणि पीयूष चावला या आयपीएलमधून जवळपास बाहेर गेलेल्या खेळाडूंनी संधी मिळताच स्वत:ला सिद्ध केले.
यंदाच्या आयपीएलचं वैशिष्ट्य म्हणजे क्रिकेटमधून जवळपास बाद झालेले खेळाडू पुन्हा एकदा मैदान गाजवतायत. गेल्या काही सामन्यात या खेळाडूंनी तरुणांनाही लाजवेल अशी कामगिरी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ईशांत शर्मा, अमित मिश्रा आणि पीयूष चावला हे तिन्ही खेळाडू मोठ्या काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहेत. गेल्या आयपीएलमध्ये तर या तिघांवर एकाही फ्रँचाईजीने बोलीही लावली नव्हती. पण या हंगामात या खेळाडूंवर फ्रँचाईजीने बोलीही लावली आणि त्यांना मैदानातही उतरवलं. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी आपल्या संघाला निराश केलं नाही.
ईशांतने मिळवून दिला दिल्लीला पहिला विजय
सलग पाच पराभव स्वीकारणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला पहिला विजय मिळवून दिला तो वेगवाग गोलंदाज ईशांत शर्माने. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध दिल्लीने इशांतचा ऐनवेळी संघात समावेश केला. मिळालेल्या संधीचं ईशांतनेही सोनं केलं. चार षटकात ईशांतने केवळ १९ धावा देत २ विकेट घेतल्या. इतकंच नाही तर प्लेअर ऑफ दे मॅचचा मानही त्याने पटकावला.
मुंबईचा संकटमोचक पीयूष चावला
मुंबई इंडियन्ससाठी या हंगामात सर्वाधिक विकेट आणि सर्वोत्तम इकोनॉमी रेट असलेला गोलंदाज म्हणजे पीयूष चावला. पीयूष चावलाने पाच सामन्यांत ७ बळी घेतले असून या दरम्यान त्याचा इकोनॉमी रेट ७.१५ असा प्रभावी आहे.
अमित मिश्रा ठरतोय लखनौचा आधारस्तंभ
लेगस्पीनर अमित मिश्रा आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्स संघाकडून खेळत आहे. त्याला तीन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. या दरम्यान त्याला तीनच बळी मिळवता आले असले तरी प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्येला त्याने चांगलाच लगाम घातला आहे. याचा पुरावा म्हणजे त्याचा इकाॅनॉमी रेट. तो ७ असा प्रभावी आहे.
वृत्तसंस्था