Domestic cricket : आता देशांतर्गत क्रिकेटही मालामाल!

भारत हे क्रिकेटचे मोठे मार्केट असल्याने भारतीय क्रिकेटचे संचलन करणारी बीसीसीआय ही संघटना, भारतीय संघ, आयपीएलमध्ये खेळणारे खेळाडू हे क्रिकेटविश्वातील इतर घटकांना हेवा वाटावा, इतके श्रीमंत बनले. असे असले तरी, देशांतर्गत विविध स्पर्धांमधील विजेत्यांना त्या तुलनेत खूपच कमी रक्कम मिळत होती. आता हा फरक काही प्रमाणात का होईना, भरून काढण्यासाठी बीसीसीआयने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 18 Apr 2023
  • 01:17 pm
आता देशांतर्गत क्रिकेटही मालामाल!

आता देशांतर्गत क्रिकेटही मालामाल!

रणजी विजेत्यांना दोनऐवजी पाच कोटी, महिलांच्या पारितोषिक रकमेत लक्षणीय वाढ

#मुंबई

भारत हे क्रिकेटचे मोठे मार्केट असल्याने भारतीय क्रिकेटचे संचलन करणारी बीसीसीआय ही संघटना, भारतीय संघ, आयपीएलमध्ये खेळणारे खेळाडू हे क्रिकेटविश्वातील इतर घटकांना हेवा वाटावा, इतके श्रीमंत बनले. असे असले तरी, देशांतर्गत विविध स्पर्धांमधील विजेत्यांना त्या तुलनेत खूपच कमी रक्कम मिळत होती. आता हा फरक काही प्रमाणात का होईना, भरून काढण्यासाठी बीसीसीआयने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या अंतर्गत देशांतर्गत स्पर्धांमधील विजेत्या संघांच्या पारितोषिक रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

आयपीएलचे १६ वे सत्र रंगात आले असताना बीसीसीआय सचिव जय शहा यांनी देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार, आता रणजी चषक या देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वांत मोठी स्पर्धा असलेल्या विजेत्या संघाला ५ कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याचबरोबर, उपविजेत्या संघाला ३ कोटी रुपये मिळतील. यापूर्वी  विजेत्या संघाला २ कोटी, तर उपविजेत्या संघाला १ कोटी रुपये मिळत असत. हे बघता रणजी विजेत्यांच्या पारितोषिक रकमेत करण्यात आलेली वाढ दुपटीपेक्षा जास्त आहे. या वर्षीपासून राष्ट्रीय स्पर्धांमध्ये वाढीव पारितोषिके देण्यात येणार आहेत.

जय शहा यांनी पूर्वीच्या आणि आताच्या पारितोषिक रकमेतील फरक स्पष्ट करणारे ट्वीट करत ही माहिती दिली. दुलीप चषक तसेच विजय हजारे चषक स्पर्धांमधील विजेत्यांच्या पारितोषिक रकमेतही घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुलीप चषकाच्या पूर्वी विजेत्या आणि उपविजेत्याला अनुक्रमे ४० आणि २० लाख रुपये मिळत असत. ही रक्कम आता अनुक्रमे १ कोटी आणि ५० लाख अशी वाढविण्यात आली आहे. विजय हजारे चषक विजेत्या आणि उपविजेत्यांना आता १ कोटी आणि ५० लाख रुपये मिळणार आहेत. पूर्वी ही रक्कम ३० लाख आणि १५ लाख अशी होती. इराणी चषक विजेत्या संघाचे पारितोषिक दुप्पट वाढवून ५० लाख रुपये करण्यात आले आहे. उपविजेत्या संघाला आता २५ लाख रुपये मिळतील. पूर्वी या स्पर्धेतील उपविजेत्या संघाला पारितोषिक मिळतच नव्हते.

सीनियर महिला एकदिवसीय स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना अनुक्रमे ५० आणि २५ लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. यापूर्वी ही रक्कम अनुक्रमे ६ लाख आणि ३ लाख इतकी कमी होती. सीनियर महिला टी-२० स्पर्धेतील विजेत्या-उपविजेत्या संघांना आता ४० लाख आणि २० लाखांचे पारितोषिक मिळणार आहे. पूर्वी विजेत्या संघाला ५ लाख तर उपविजेत्यांना ३ लाखांवर समाधान मानावे लागत असे.

या निर्णयाची घोषणा करताना, बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सध्याची आणि नवीन फी संरचना शेअर केली. तसेच बीसीसीआयने आयोजित केलेल्या सर्व देशांतर्गत स्पर्धांच्या बक्षीस रकमेत वाढ केल्याबद्दल आनंद वाटत असल्याचे ते म्हणाले.  देशांतर्गत क्रिकेट पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही भविष्यातही अशी पावले उचलत राहू, असेही जय शहा यांनी नमूद केले.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story