एक विकेट नाही, धावाही नाहीत कराराची रक्कम मात्र १४ कोटी!
#चेन्नई
आयपीएलमुळे अनेक खेळाडू मालामाल झाले आहेत. लिलावत अनेकांवर कोट्यवधी रुपयांची बोली लावण्यात येते. त्यापैकी काही हिट ठरतात, तर काही फ्लाॅप. यंदाच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जने १४ कोटी रुपयांत दीचक चहरला रिटेन केले. मात्र पहिल्या दोन सामन्यांत तो साफ अपयशी ठरला. यात त्याला बळीही मिळाला नाही आणि धावादेखील करता आल्या नाहीत. यामुळे त्याला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे.
दुखापतीमुळे चहर मागील वर्षीच्या आयपीएलमध्ये एकही सामना खेळू शकला नव्हता. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याची कामगिरी करारादाखल मिळालेल्या पैशाच्या आसपासही नाही. यंदा चेन्नईने चहरला १४ कोटी रुपये मोजून रिटेन केले. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांत चहरने ८ षटकांमध्ये तब्बल ८४ धावांची खिरापत वाटली. मात्र त्याला एकही बळी घेता आला नाही.
आयपीएल-१६ मधील सलग दुसऱ्या सामन्यात चहर विकेट घेण्यात अपयशी ठरला. फलंदाजीत अजून त्याला संधी मिळालेली नाही. पण गोलंदाजीत त्याने टीमसाठी चांगली कामगिरी करण्याऐवजी वाट लावली. चहर आपल्या क्षमतेनुसार, प्रदर्शन करण्यात कमी पडत आहे. पहिल्या दोन सामन्यांत त्याचा इकॉनाॅमी रेट १० पेक्षा जास्त आहे.
आयपीएलमधील किफायती गोलंदाजांमध्ये दीपक चहरची गणणा होते. शिवाय पाॅवरप्लेमध्ये तो नव्या चेंडूने विकेट घेण्यात माहीर आहे. यंदा मात्र त्याची गोलंदाजी प्रभावहीन ठरत आहे. स्पर्धेला सुरुवात होण्याआधी दुखापत होऊ नये, यासाठी चहरने खूप काळजी घेतली, पण परफॉर्मन्सचे गणित मात्र पहिल्या दोन सामन्यांत जुळलेले नाही. आणखी एक-दोन सामन्यांत अपयशी ठरल्यास धोनी त्याला बाहेर बसवू शकतो.
लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध दुसऱ्या सामन्यात दीपक चहरने ४ ओव्हरमध्ये ५५ धावा दिल्या. या दरम्यान त्याला विकेट तर मिळाली नाहीच, उलट त्याने तब्बल ५ वाइड बाॅल टाकले. लखनौविरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांनी एकूण १३ वाइड बॉल टाकले. यात सर्वात जास्त योगदान अर्थातच चहरचे होते. वृत्तसंस्था