मास्टर ब्लास्टर पन्नाशीत, सहा विक्रम अद्यापही अभेद्य!

क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरने सामेवारी (दि. २४) आयुष्याचे अर्धशतक पूर्ण केले. त्याने १५ नोव्हेंबर १९८९ रोजी पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. सचिन शेवटचा सामना १६ नोव्हेंबर २०१३ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला. सचिनची कारकीर्द २४ वर्षे आणि १ दिवसाची होती. या दरम्यान त्याने एकूण ६६४ सामने खेळले आणि ३४,३५७ धावा फटकावल्या. या दरम्यान सचिनने केलेले सहा विक्रम मोडणे अशक्य आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 25 Apr 2023
  • 06:35 am
मास्टर ब्लास्टर पन्नाशीत, सहा विक्रम अद्यापही अभेद्य!

मास्टर ब्लास्टर पन्नाशीत, सहा विक्रम अद्यापही अभेद्य!

#मुंबई

क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरने  सामेवारी (दि. २४) आयुष्याचे  अर्धशतक पूर्ण केले. त्याने १५ नोव्हेंबर १९८९ रोजी पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. सचिन शेवटचा सामना १६ नोव्हेंबर २०१३ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला. सचिनची कारकीर्द २४ वर्षे आणि १ दिवसाची होती. या दरम्यान त्याने एकूण ६६४ सामने खेळले आणि ३४,३५७ धावा फटकावल्या. या दरम्यान सचिनने केलेले सहा विक्रम मोडणे अशक्य आहेत.  

सर्वाधिक कसोटी आणि एकदिवसीय सामने  

सचिन हा २०० आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळणारा जगातील एकमेव खेळाडू आहे. या यादीत सचिन पहिल्या क्रमांकावर आहे, तर जेम्स अँडरसन १७९ सामन्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनने २३ वर्षांच्या वनडे कारकिर्दीत एकूण ४६३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. १९९० ते १९९८ दरम्यान तो सलग १८५ वनडे सामने खेळला. हा जागतिक विक्रम आहे. सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळण्याच्या बाबतीत, त्याच्या पाठोपाठ श्रीलंकेचा महेला जयवर्धने ४४८ सामन्यांसह दुसऱ्या स्थानी आहे.

सर्वाधिक धावा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (तिन्ही फॉरमॅटसह) सर्वाधिक धावा सचिनच्या नावावर आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३० हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये इतक्या धावा करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. त्याच्या नावे एकूण ३४,३५७ धावांची नोंद आहे. सचिननंतर श्रीलंकेचा कुमार संगकाराचा (२८,०१६) क्रम येतो.  

सर्वाधिक शतके

जागतिक क्रिकेटमध्ये १०० शतके झळकावणारा सचिन एकमेव आहे. हा एक मोठा विक्रम आहे जो कोणत्याही फलंदाजाला मोडणे कठीण आहे. सचिनने कसोटीत ५१, तर वनडेत ४९ शतके झळकावली. सचिननंतर सर्वाधिक शतके झळकावणाऱ्यांमध्ये विराट कोहली (७५) दुसऱ्या स्थानी आहे.  

सर्वाधिक अर्धशतके

कारकिर्दीत सर्वाधिक शतकांशिवाय सर्वाधिक अर्धशतकेदेखील सचिननेच झळकावली आहेत. त्याने  तिन्ही फॉरमॅटमध्ये ७८२ डावांमध्ये एकूण १६४ अर्धशतके ठोकण्याचा विक्रम केला आहे. १४६ अर्धशतकांसह ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे.

सर्वाधिक चौकार

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे. मास्टर ब्लास्टरने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ६६४ सामन्यांत तब्बल ४,०७६ चौकार मारले. त्याच्या नावावर कसोटीत २,०५८ तर एकदिवसीय प्रकारात २,०१६ चौकारांची नोंद आहे. उर्वरित दोन चौकार त्याने एकमेव टी-२० त लगावले.

विश्वचषकात सर्वाधिक धावा

विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे. १९९२ ते २०११ दरम्यान एकूण सहा विश्वचषकांमध्ये त्याने ४५ सामन्यांच्या ४४ डावांत २,२७८ धावा केल्या. सचिनने वर्ल्ड कपमध्ये ६ शतके आणि १५ अर्धशतके झळकावली आहेत. एकाच विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही सचिनच्याच नावावर आहे. २००३ मध्ये त्याने ११ सामन्यांत ६७३ धावा फटकावल्या होत्या.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story