आयपीएलमधील जादू!

हृतिक रोशन आणि प्रीती झिंटा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘कोई मिल गया’ हा चित्रपट माहीत असलेच. परग्रहावरून आलेली ‘जादू’ ही व्यक्तिरेखा या चित्रपटाच्या केंद्रस्थानी होती. या ‘जादू’ची शक्ती सूर्यप्रकाशाशी निगडित होती. सूर्य चमकत असेल तरच त्याच्यातील अमानवी शक्ती जागृत होत असे. आयपीएलमध्ये दिवसा होणाऱ्या लढतींतील चमकदार कामगिरीचा विचार करता राजस्थान राॅयल्सचा सलामीवीर जोस बटलर हा ‘जादू’ ठरतो.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sun, 9 Apr 2023
  • 02:51 am
आयपीएलमधील जादू!

आयपीएलमधील जादू!

#गुवाहाटी

हृतिक रोशन आणि प्रीती झिंटा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘कोई मिल गया’ हा चित्रपट माहीत असलेच. परग्रहावरून आलेली ‘जादू’ ही व्यक्तिरेखा या चित्रपटाच्या केंद्रस्थानी होती. या ‘जादू’ची शक्ती सूर्यप्रकाशाशी निगडित होती. सूर्य चमकत असेल तरच त्याच्यातील अमानवी शक्ती जागृत होत असे. आयपीएलमध्ये दिवसा होणाऱ्या लढतींतील चमकदार कामगिरीचा विचार करता राजस्थान राॅयल्सचा सलामीवीर जोस बटलर हा ‘जादू’ ठरतो.

गुवाहाटीच्या क्रिकेट मैदानावर राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात यंदाच्या आयपीएलचा ११ वा सामना खेळला गेला. यात राजस्थानच्या दोन्ही सलामीवीरांनी तुफानी फलंदाजी केली. अनुभवी  बटलरने आपला शानदार फॉर्म कायम राखत आणखी एक अर्धशतक झळकावले. त्याने ५१ चेंडूंत ११ चौकार आणि एका षटकारासह ७९ धावा केल्या. त्याचबरोबर आयपीएलमध्ये दिवसाच्या सामन्यांमध्ये त्याची कामगिरी सातत्याने चमकदार होत आहे.

आयपीएलमध्ये सामने प्रामुख्याने सायंकाळच्या वेळी खेळले जातात. मात्र, शनिवारी आणि रविवारी दोन सामने असल्याने एक सामना दुपारच्या वेळी  सुरू होतो. अशा दुपारच्या सामन्यांमध्ये बटलरची कामगिरी जबरदस्त असल्याचे दिसून येते. बटलरने दुपारच्या ७ सामन्यांमध्ये ७२.७० च्या सरासरीने ५०९ धावा फटकावल्या असून या दरम्यान त्याने २ शतके आणि ३ अर्धशतके झळकावली. विशेष म्हणजे, या दुपारच्या सामन्यांत त्याचा स्ट्राइक रेटदेखील १६७.२० असा जबरदस्त होता. आयपीएलमधील बटलरची एकूण कामगिरी ध्यानात घेता, दुपारच्या सामन्यांमधील ही कामगिरी त्यापेक्षा उजवी ठरते.

यंदा हैदराबादविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात बटलर अवघ्या १९ धावांवर बाद झाला. त्यानंतर या तिसऱ्या सामन्यात त्याने पुन्हा धडाकेबाज फलंदाजी केली.  सुरुवातीला यशस्वी जयस्वालने आक्रमक फटके लगावल्यानंतर बटलरनेही आपले हात मोकळे केले.  

बटलर हा मागील हंगामापासून जबरदस्त फॉर्ममध्ये दिसून येत आहे. मागील वर्षी त्याने सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप पटकावली होती. आतादेखील शनिवारी संपलेल्या पहिल्या लढतीपर्यंतचा विचार करता, स्पर्धेत सर्वाधिक १५२ धावा त्याच्याच नावे आहेत. राजस्थानला दुसरे विजेतेपद मिळवून देण्यासाठी त्याचा हाच फॉर्म कायम राहणे आवश्यक आहे.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest