IPL : गुजरातच्या गोलंदाजांकडून लखनौची शिकार

घरच्या मैदानावर लखनौ सुपर जायन्ट्सच्या गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीला फलंदाजांची साथ लाभली नाही. दुसरीकडे, गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना माफक धावसंख्येचा यशस्वी बचाव करीत चुरशीच्या सामन्यात शनिवारी (दि. २२) आपल्या संघाला ७ धावांनी विजय मिळवून दिला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 23 Apr 2023
  • 01:55 am
गुजरातच्या गोलंदाजांकडून लखनौची शिकार

गुजरातच्या गोलंदाजांकडून लखनौची शिकार

चुरशीच्या सामन्यात ७ धावांनी विजय, मोहित शर्माने टाकलेल्या अखेरच्या षटकात ४ बळी

#लखनौ

घरच्या मैदानावर लखनौ सुपर जायन्ट्सच्या गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीला फलंदाजांची साथ लाभली नाही. दुसरीकडे, गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना माफक धावसंख्येचा यशस्वी बचाव करीत चुरशीच्या सामन्यात शनिवारी (दि. २२) आपल्या संघाला ७ धावांनी विजय मिळवून दिला.

प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने २० षटकांत ६ बाद १३५ अशी मर्यादित धावसंख्या उभारली. कर्णधार हार्दिक पंड्याने सर्वाधिक ६६ धावा केल्या. कृणाल पंड्या आणि मार्कस स्टाॅईनस यांनी अनुक्रमे १६ आणि २० धावांत प्रत्येकी २ बळी घेत गुजरातच्या धावसंख्येला लगाम घातला. रवी बिष्णोईचा अपवाद वगळता लखनौच्या इतर गोलंदाजांनीही प्रभावी मारा केला. प्रत्युत्तरात, फलंदाजीत लखनौचा संघ अपयशी ठरल्याने त्यांच्या गोलंदाजांच्या कामगिरीवर पाणी फेरले गेले. विजयासाठी १३६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हा संघ २० षटकांत ७ बाद १२८ धावाच करू शकला. सलामीला आालेल्या कर्णधार के. एल. राहुलने सर्वाधिक ६८ धावा केल्या. मात्र, अखेरच्या षटकांतील त्याच्या संथ फलंदाजीचा फटका लखनौ संघाला पराभवाच्या रूपात बसला. गुजराततर्फे मोहित शर्माने अखेरच्या षटकात १२ धावांचे यशस्वी रक्षण करताना केवळ ४ धावांत दोन बळी घेतले तर दोन फलंदाज धावबाद झाले. मोहितच सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

तत्पूर्वी, कर्णधार हार्दिक पंड्याचे अर्धशतक आणि सलामीवीर वृद्धिमान साहाच्या ४७ धावांमुळे पाहुण्या गुजरात टायटन्स संघाला सव्वाशेचा टप्पा ओलांडता आला. हार्दिकने ५० चेंडूंत ६६ धावा करताना ४ षटकार आणि २ चौकार लगावले. यंदाच्या आयपीएलमधील त्याचे हे पहिलेच अर्धशतक ठरले. साहाने ३७ चेंडूंत ६ चौकार लगावले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९.१ षटकांत केलेली ६८ धावांची भागिदारी गुजरातच्या डावात सर्वोच्च ठरली. या दोघांव्यतिरिक्त विजय शंकरलाच (१०) दुहेरी धावसंख्या ओलांडता आली.

लखनौतर्फे कर्णधार राहुलने ६१ चेंडूंत ८ चौकारांसह सर्वाधिक ६८ धावा केल्या असल्या तरी अखेरच्या षटकांत वेगाने फलंदाजी करणे आवश्यक असताना तो संथपणे खेळला. अखेरच्या २३ चेंडूंत त्याने अवघ्या १८ धावा केल्या. अखेरच्या षटकात मोहितने त्याला बाद केले. दुसऱ्याच चेंडूवर मार्कस स्टाॅईनसला शून्यावर बाद करीत त्याने लखनौचे टेन्शन वाढवले. त्यापुढील सलग दोन चेंडूवर आयुष बदोनी (८) आणि दीपक हुडा (२) धावबाद झाले. यामुळे लखनौचा विजय हुकला.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story