‘मंकडिंग’वरून पुन्हा जुंपली
#बंगळुरू
राॅयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला घरच्या मैदानावर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात लखनौ सुपर जायन्ट्सविरुद्ध अखेरच्या चेंडूवर पराभव पत्करावा लागला. शेवटच्या चेंडूवर लखनौला विजयासाठी एक धाव हवी होती. यावेळी गोलंदाज हर्षल पटेल नॉन स्ट्रायकर रवी बिष्णोईला मंकडिंगवर बाद करण्यात अपयशी ठरला. या घटनेवरून मंकडिंग हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
हर्षलच्या हातून चेंडू सुटण्यापूर्वीच नॉन स्ट्राइकिंग एण्डवर उभ्या असलेल्या रवी बिष्णोईने क्रीझ सोडली होती. त्यावेळी हर्षलने बिष्णोईला बाद करण्याचा प्रयत्न केला. आयसीसीच्या नव्या नियमानुसार, मंकडिंग आता अधिकृत करण्यात आली आहे. त्यामुळे हर्षलचा प्रयत्न सफल झाला असता तर बिष्णोई तंबूत परतून सामना कदाचित सुपर ओव्हरमध्ये गेला असता. पण हर्षल चुकला आणि बंगलोरची ही संधीही हुकली. पण बिष्णोईला बाद करण्याच्या हर्षलच्या प्रयत्नामुळे पुन्हा एकदा क्रिकेटमधील मंकडिंग वाद पेटला आहे.
प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी सामन्यानंतर यासंबंधी एक ट्विट केले. त्यांचे हे ट्विट क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे. हर्षा आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ‘‘नाॅन स्ट्रायकिंग एण्डवर उभ्या असलेल्या रवी बिश्नोईने लवकर क्रीज सोडली होती. त्यामुळे नॉन स्ट्रायकरवरील फलंदाजाला धावबाद करू नका, असे म्हणणारे लोक आजही आहेत का?'
भोगले यांचे ट्विट पाहून इंग्लंडच्या विश्वविजेतेपदाचा शिल्पकार आणि या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत असलेल्या बेन स्टोक्सने त्यावर आपले मत व्यक्त केले. यात त्याने मंकडिंगच्या वादावर तोडगा म्हणून एक सूचना केली. आपल्या ट्विटमध्ये तो म्हणतो, ‘‘ मैदानावरील पंचांनी हुशारीने काम घेतले पाहिजे. फलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वीच क्रीज सोडली तर त्याच्या संघाला सहा धावांचा दंड ठोठावायला हवा. असे झाले तर निश्चितच कोणताही वाद न होता फलंदाजांना असे करण्यापासून रोखता येईल.’’ बेन स्टोक्सच्या या ट्विटवर अनेकांनी अनुकूल तसेच प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
आरसीबीने या सामन्यात २ बाद २१२ धावा फटकावूनही त्यांना पराभव पत्करावा लागला. लखनौ संघाने ९ गड्यांच्या मोबदल्यात शेवटच्या चेंडूवर हे आव्हान यशस्वीपणे पार केले. या सामन्यात निकोलस पूरनने १९ चेंडूंत ६२ धावांची वादळी खेळी करीत आरसीबीची वाताहत केली. त्याने ७ षटकार आणि ४ चौकारांची आतषबाजी केली. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट ३२६.३१ असा अचाट होता. पूरनशिवाय मार्कस स्टाॅयनिसने ३० चेंडूंत ५ षटकार आणि ६ चौकारांसह ६५ धावा चोपल्या होत्या. तत्पूर्वी, आरसीबीतर्फे कोहलीने ६१ (४४ चेंडूंत ४ षटकार, ४ चौकार) तर कर्णधार फाफ ड्यूप्लेसीसने ७९ धावांची (४६ चेंडूंत ५ षटकार, ५ चौकार) आक्रमक खेळी केली. तर मॅक्सवेलने २९ चेंडूंत ६ षटकार आणि ३ चौकारांसह ५९ धावांचा पाऊस पाडत आपल्या संघाला दोनशेपार नेले होते.
वृत्तसंस्था