संग्रहित छायाचित्र
पर्थ : बॉर्डर-गावसकर सिरीज कसोटी मालिकेतील पहिली लढत जिंकण्याच्या दिशेने भारताने दमदार वाटचाल केली आहे. टीम इंडियाने रविवारी (दि. २४) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यजमान कांगारूंसमोर विजयासाठी ५३४ धावांचे अवघड लक्ष्य ठेवले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद १२ अशी नाजूक झाली होती. सामन्याचे आणखी दोन दिवस शिल्लक असून भारताला विजयासाठी सात विकेटची आवश्यकता आहे. भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने झळकावलेले ३०वे कसोटी शतक हे भारताच्या दुसऱ्या डावाचे वैशिष्ट्य ठरले.
जगातील सर्वांत वेगवान खेळपट्टी अशी ओळख असलेल्या पर्थवर ही लढत सुरू आहे. पहिल्या डावात ४६ धावांची आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाने रविवारी तिसऱ्या सत्रात आपला दुसरा डाव ६ बाद ४८७ धावांवर घोषित केला आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ५३४ धावांचा पाठलाग करण्याचे आव्हान दिले. प्रत्त्युत्तरात, कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांनी अवघ्या २६ चेंडूंत तीन विकेट घेत कांगारुंच्या उरात धडकी भरवली. बुमराहने दोन तर सिराजने एक विकेट घेतली.
विराट कोहलीने मार्नस लाबुशेनच्या गोलंदाजांवर चौकार लगावून शतक पूर्ण करताच भारतीय कर्णधार बुमराहने भारताचा डाव घोषित केला. विराटने १४३ चेंडूंत नाबाद १०० धावा करताना २ षटकार आणि ८ चौकार लगावले. त्यापूर्वी, सलामीवीर यशस्वी जयस्वालने कारकिर्दीतील चौथे कसोटी शतक झळकावून भारताच्या डावाला मजबुती दिली. त्याने २९७ चेंडूंतील १६१ धावांच्या खेळीत ३ षटकार आणि १५ चौकार लगावले. दुसरा सलामीवीर केएल राहुलने १७६ चेंडूंत ५ चौकारांसह ७७ धावा केल्या. यशस्वी राहुल जोडीने भारताला २०१ धावांची भक्कम सलामी दिली होती. वाॅशिंग्टन सुंदरने २९ तर नितीशकुमार रेड्डीने नाबाद ३८ धावांचे योगदान दिले.
चहापानाच्या विश्रांतीपूर्वी टीम इंडियाने पाच विकेट गमावल्या होत्या. ध्रुव जुरेल आणि ऋषभ पंत यांनी प्रत्येकी एक धाव काढली. मिचेल मार्शने यशस्वीची विकेट घेत २०१ धावांची सलामीची भागीदारी संपवली. देवदत्त पडिक्कल (२५ धावा) जोश हेझलवूडचा तर केएल राहुल मिचेल स्टार्कचा बळी ठरला.
टीम इंडियाने कालच्या बिनबाद १७२ वरून पुढे खेळायला सुरुवात केली. त्यावेळी यशस्वी ९० तर राहुल ६२ धावांवर खेळत होते. त्यानंतर भारतीयांनी सामन्यावर पकड घट्ट करणारी फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाकडून नाथन लाॅयनने दोन तर मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड, कर्णधार पॅट कमिन्स आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. तत्पूर्वी, भारताने पहिल्या डावात १५० धावा केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला १०४ धावांवर गुंडाळले होते.
विजयासाठी ५३४ धावांच्या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या कांगारुंना बुमराहने पहिल्या षटकात दणका दिला. त्याने सलामीवीर नाथन मॅक्वीनीला भोपळाही फोडू न देता पायचित केले. त्यानंतर मोहम्मद सिराजने चौथ्या षटकात नाईट वाॅचमन म्हणून आलेल्या कर्णधार पॅट कमिन्सला (२) विराटकरवी झेलबाद करीत कांगारुंची अवस्था २ बाद ९ अशी केली. पुढच्या षटकात बुमराहने खेळपट्टीवर ठाण मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मार्नस लाबुशेनला (३) पायचित पकडून भारताला मोठे यश मिळवून दिले. लाबुशेन बाद होताच पंचांनी दिवसाचा खेळ संपल्याचे जाहीर केले.