जेद्दाह : सौदी अरेबियातील जेद्दाह येथे सुरू असलेल्या मेगा लिलावात ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर हे दोन भारतीय क्रिकेटपटू आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठे खेळाडू ठरले आहेत. व्यंकटेश अय्यर तिसरा सर्वांत महागडा भारतीय खेळाडू ठरला.
पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी रविवारी आणि सोमवारी (दि. २४, २५) हा मेगा लिलाव झाला. यात पहिल्या क्रमांकावर ऋषभ पंत आहे. तो आतापर्यंतच्या लिलिावातील सर्वात महागडा क्रिकेटर ठरला. दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक-फलंदाज असलेल्या ऋषभला लखनौ सुपर जायंट्सने तब्बल २७ कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतले. केएील राहुलऐवजी आता तो या संघाचे नेतृत्व करणार आहे.
दुसऱ्या क्रमांकावरफलंदाज श्रेयस अय्यर आहे. त्याने गेल्या मोसमात आपल्या नेतृत्वाखाली कोलकाता नार्ठट रायडर्स संघाला चॅम्पियन बनवले होते. श्रेयसला यावेळी पंजाब किंग्जने २६.७५ कोटींची बोली लावून विकत घेतले.
व्यंकटेश अय्यरची डील आश्चर्यकारक ठरली. त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स यांच्यात लिलावात चांगलीच चुरस पाहायला मिळाली. या दोन्ही संघांनी त्याच्यासाठी २३.५० कोटी रुपयांपर्यंतच्या बोली लावली होती. अखेर कोलकाताने व्यंकटेशला २३.७५ कोटी मोजून करारबद्ध केले. वेंकटेशनने गेल्या आयपीएल फायनलमध्ये हैदराबादविरुद्ध अर्धशतक झळकावले होते.
गेल्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळलेला रसीख दार या मोसमातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. आरसीबीने त्याला सहा कोटींना खरेदी केले. मिचेल स्टार्कला दिल्लीने ११.७५ कोटींना विकत घेतले. गेल्या मोसमात त्याला कोलकात्याने त्याच्यासाठी २४.७५ कोटी रुमये मोजले होते. यावेळी किंमत निम्म्यापेक्षाही कमी झाली. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि इंग्लंडचा आघाडीचा फलंदाज जॉनी बेअरस्टो अनसोल्ड राहिले.
ऋषभ पंत (लखनौ सुपरजायंट्स) : २७ कोटी रुपये
श्रेयस अय्यर (पंजाब किंग्ज) : २६.७५ कोटी रुपये
व्यंकटेश अय्यर (कोलकाता नाईट रायडर्स) : २३.७५ कोटी रुपये