संग्रहित छायाचित्र
पर्थ : जगातील सर्वांत वेगवान खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांची भंबेरी उडवण्याच्या उद्देशाने उत्साहात मैदानात उतरलेले कांगारू चारच दिवसात पाहुण्या संघासाठी खणलेल्या खड्ड्यात पडले. पहिल्या कसोटीत भारताने यजमान ऑस्ट्रेलियाचा २९५ धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह पाच सामन्यांच्या प्रतिष्ठेच्या बॉर्डर-गावसकर चषक मालिकेत टीम इंडियाने १-० अशी आघाडी घेतली आहे.
विजयासाठी ५३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघाचा दुसरा डाव सोमवारी ५८.४ षटकांत २३८ धावांवर आटोपला. या संघातर्फे ट्रेव्हिस हेडने सर्वाधिक ८९ धावा केल्या. त्याखालोखा मिचेल मार्शने ४७ धावांचे योगदान दिले. भारताकडून दुसऱ्या डावातही वेगवान गोलंदाजांनी शानदार मारा केला आणि खेळपट्टीचा लाभ उचलत आठ बळी घेतले. पहिल्या डावात यजमानांचे दहाही बळी वेगवान गोलंदाजांनीच घेतले होते. दुसऱ्या डावात कर्णधसार जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. ऑफ स्पिनर वाॅशिंग्टन सुंदरने दोन तर हर्षित राणा आणि नितीशकुमार रेड्डी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. पहिल्या डावातील पाच बळींसह सामन्यात एकूण आठ विकेट घेणारा बुमराह ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला.
बुमराहसह सलामीवीर यशस्वी जयस्वाल, दिग्गज फलंदाज विराट कोहली, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि पहिलीच कसोटी खेळणारा नव्या दमाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांनीदेखील भारताच्या या विजयात मोलाचे योगदान दिले. यशस्वीने दुसऱ्या डावात शानदार १६१ धावांची खेळी केली. विराटनेही नाबाद शतक झळकावत ऑस्ट्रेलियावर दबाव निर्माण केला. सिराजने पहिल्या डावात दोन तर दुसऱ्या डावात तीन असे ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीतील आघाडीचे पाच फलंदाज गारद करीत आपली भूमिका चोखपणे पार पाडली. दिल्लीच्या २२ वर्षीय हर्षितने आपला वेग आणि अचूकतेची छाप पाडताना पहिल्या डावातील तीन बळींसह सामन्यात चार विकेट घेतल्या.
या विजयामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. कुठल्याही जर-तरशिवाय या मालिकेच्या अंतिम फेरीत खेळण्यासाठी टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर चषक मालिका ४-०ने जिंकणे आवश्यक आहे. दुसरा सामना ६ डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये होणार आहे.
पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर सोमवारी झालेल्या सामन्याच्या चौथ्या दिवशी 534 धावांचे आव्हान पेलणाऱ्या कांगारूंचा संघ दुसऱ्या डावात 238 धावांत सर्वबाद झाला. तत्पूर्वी, भारताने दुसरा डाव टीम इंडियाने पहिल्या डावात १५० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०४ धावांवर गुंडाळून भारताने ४६ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर आपला दुसरा डाव ६ बाद ४८७ धावांवर घोषित करत पाहुण्या संघाने कांगारुंसमोर विजयासाठी दोन दिवसांपेक्षा अधिक वेळेत ५३४ धावांचे अवघड आव्हान ठेवले होते. रविवारीच (दि. २४) भारताने ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद १२ अशी करत विजयाकडे कूच केले होते. भारतासाठी कायम डोकेदुखी ठरणारा ट्रेव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांचा अपवाद वगळता यजमान फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर अपयशी ठरले.
भारताचा ऑस्ट्रेलियातील सर्वांत मोठा विजय
पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा हा भारताकडून झालेला पहिलाच पराभव आहे. याआधी दोन्ही संघांनी येथे चार सामने खेळले होते आणि ते सर्व जिंकले होते. ऑस्ट्रेलियात भारताचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा कसोटी विजय ठरला. यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलियात मिळवलेला सर्वात मोठा विजय २२२ धावांचा होता. १९७७ मध्ये भारतीय संघाने मेलबर्नमध्ये हा पराक्रम केला होता.
संक्षिप्त धावफलक :
भारत : पहिला डाव : सर्व बाद १५०.
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : सर्व बाद १०४.
भारत : दुसरा डाव : ६ बाद ४८७ धावांवर घोषित.
ऑस्ट्रेलिया : दुसरा डाव : ५८.४ षटकांत सर्व बाद २३८ (ट्रेव्हिस हेड ८९, मिचेल मार्श ४७, ॲलेक्स कॅरी ३६, जसप्रीत बुमराह ३/४२, मोहम्मद सिराज ३/५१, वाॅशिंग्टन सुंदर २/४८, नितीशकुमार रेड्डी १/२१, हर्षित राणा १/६९).
सामनावीर : जसप्रीत बुमराह (सामन्यात आठ बळी)