Jofra Arche : जोफ्रा आर्चर आयपीएलबाहेर

दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह आधीच स्पर्धेबाहेर असल्याने वेगवान गोलंदाजीची बाजू लंगडी झालेल्या मुंबई इंडियन्सला यंदाची आयपीएल निर्णायक वळणावर आलेली असतानाच मोठा धक्का बसला आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलमधून बाहेर झाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 10 May 2023
  • 03:31 am
जोफ्रा आर्चर आयपीएलबाहेर

जोफ्रा आर्चर आयपीएलबाहेर

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, पर्यायी वेगवान गोलंदाज म्हणून ख्रिस जाॅर्डनला संधी

#मुंबई

दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह आधीच स्पर्धेबाहेर असल्याने वेगवान गोलंदाजीची बाजू लंगडी झालेल्या मुंबई इंडियन्सला यंदाची आयपीएल निर्णायक वळणावर आलेली असतानाच मोठा धक्का बसला आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलमधून बाहेर झाला आहे.

जसप्रीत बुमराह आयपीएलला मुकल्यानंतर इंग्लंडचा भन्नाट वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरवर मुंबईच्या गोलंदाजीची मदार होती. मात्र दहापैकी पाचच सामन्यात तो खेळू शकला. आता उर्वरित सामन्यात तो खेळू शकणार नसल्याची माहिती मुंबई इंडियन्सकडून मंगळवारी (दि. ९) जाहीर करण्यात आली. त्याच्याऐवजी इंग्लंडचाच डेथ ओव्हर स्पेशालिस्ट ३४ वर्षीय ख्रिस जॉर्डनचा मुंबई संघात समावेश करण्यात आला आहे.

या मोसमात मुंबई संघाला अद्याप समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. आतापर्यंत १० सामन्यांत ५ विजय आणि ५ पराभव अशा कामगिरीसह १० गुणांची कमाई करीत हा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. असे असले तरी, मुंबईला अद्यापही प्लेऑफसाठी पात्र ठरण्याची संधी आहे. मात्र, यासाठी त्यांना मंगळवारच्या राॅयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्धच्या लढतीसह उर्वरित चारही सामने जिंकावे लागतील. आरसीबीव्यतिरिक्त मुंबईला गुजरात टायटन्स, लखनौ सुपरजायन्ट्स आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळायचे आहे.

ख्रिस जॉर्डनने २०१६ च्या आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत तो २८ सामन्यांत खेळला आहे. यात त्याने २७ गडी बाद केले आहेत. वेगवान गोलंदाज असलेल्या ख्रिस जॉर्डनने ८७ टी२० सामन्यांत ९६ बळी घेतले आहेत.  डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट अशी जॉर्डनची ओळख आहे. जॉर्डन यापूर्वी आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे.

मुंबई इंडियन्सने जॉर्डनला २ कोटी रुपये मोजून संघात घेतले आहे. आधीपासूनच जॉर्डन मुंबई इंडियन्सच्या संघासोबत होता. पण अधिकृतपणे त्याची घोषणा करण्यात आली नव्हती. आता मुंबई इंडियन्सने अधिकृत माहिती दिली आहे. ‘‘जोफ्रा आर्चरच्या जागी ख्रिस जॉर्डनचा संघात समावेश करण्यात आला आहे. आर्चर रिकव्हरी आणि फिटनेसमुळे पुढील सामन्यांत खेळणार नाही. तो मायदेशी परतणार आहे,’’ असे मुंबई इंडियन्सने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

दुखापतींचा ससेमिरा...

जोफ्रा या आयपीएलमध्ये पाच सामने खेळला. त्यात त्याला केवळ २ विकेट्स मिळाल्या. २०२२ च्या आयपीएल हंगामातही जोफ्रा मुंबई इंडियन्ससाठी एकही सामना खेळू शकला नव्हता. जोफ्रा आर्चरला सातत्याने फिटनेसच्या समस्येशी सामना करावा लागत आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड त्याच्या फिटनेसवर सातत्याने लक्ष ठेवून होते. मुंबई इंडियन्स संघातून बाहेर पडल्याल्यानंतर जोफ्रा आता मायदेशी परतणार आहे. तिथे त्याची रिहॅब प्रोसेस सुरू होईल.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story