विक्रमांबाबत आयपीएल फिकी
#नवी दिल्ली
जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलचे एक हजार सामने यंदाच्या १६ व्या हंगामात पूर्ण झाले. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात धावांचा पाऊस पडत आहे. अनेक गोलंदाजदेखील चमकदार कामगिरी करीत असतात. असे असले तरी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही महत्त्वपूर्ण विक्रम आयपीएलमध्येही अबाधित आहेत.
आतापर्यंत आयपीएलमध्ये एक हजारपेक्षा जास्त सामने खेळले गेले. या तुलनेत टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची संख्या १,०५१ इतकी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिला टी-२० सामना १७ फेब्रुवारी २००५ रोजी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला, तर १८ एप्रिल २००८ रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि राॅयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील लढतीAद्वारे आयपीएलचा श्रीगणेशा झाला. मात्र, पैशांचा ओघ प्रचंड असल्याने आयपीएलमधील संघ आणि सामन्यांची संख्या वाढली. त्यामुळे १८ वर्षांत आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांची संख्या १,०५१ इतकी असताना आयपीएल लढतींच्या संख्येने १६ वर्षांतच एक हजाराचा टप्पा पार केला. दरवर्षी जगभरातील अव्वल खेळाडू आयपीएलमध्ये अनेक विक्रम करतात आणि मोडतात. तरीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे असे काही विक्रम आहेत, जे अद्याप आयपीएलमध्ये मोडले गेले नाहीत.
वृत्तसंस्था