IND vs AUS 5th Test : सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या Playing 11 ची घोषणा,'या' अष्टपैलू खेळाडूचा संघातून पत्ता कट...

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटचा सामना सिडनी येथे होणार आहे. उद्यापासून म्हणजेच 3 जानेवारीपासून होणाऱ्या या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 2 Jan 2025
  • 10:24 am
Ind vs Aus 5th Test, Ind vs Aus

Australia's playing eleven announced for Sydney Test

India vs Australia 5th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटचा सामना सिडनी येथे होणार आहे. उद्यापासून म्हणजेच 3 जानेवारीपासून होणाऱ्या या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे. मिचेल मार्शला अखेरच्या (5th Test) सामन्यातून वगळण्यात आले आहे. तर सॅम कॉन्स्टासनंतर आता आणखी एक खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंत या मालिकेत मिचेल मार्शची कामगिरी काही विशेष झाली नाही. या अष्टपैलू खेळाडूने बॅट आणि बॉल या दोन्ही बाबतीत निराशा केली. त्यामुळे मार्शला आता सिडनी कसोटीतून वगळण्यात आले आहे.

ब्यू वेबस्टर करेल पदार्पण... 

मेलबर्न कसोटीत युवा सलामीवीर फलंदाज सॅम कॉन्स्टासने ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केले. त्यानंतर ब्यू वेबस्टर सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणार आहे. ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणारा ब्यू हा 469 वा कसोटीपटू ठरणार आहे. वेबस्टरने त्याच्या शेवटच्या तीन प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये 12 बळी घेतले आहेत, ज्यात मेलबर्न येथे नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत अ सामन्यात त्याने नाबाद 46 धावाच्या खेळीसह 6 बळी घेतले होते.

मिचेल स्टार्क फिट

मेलबर्न कसोटीनंतर मिचेल स्टार्क पाठीच्या दुखापतीमुळे सिडनी कसोटीला मुकणार असल्याच्या बातम्या येत होत्या, पण आता प्लेईंग इलेव्हन समोर आल्यानंतर स्टार्क पूर्णपणे तंदुरुस्त असून खेळण्यासाठीही तयार आहे.

सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचे प्लेइंग इलेव्हन पुढीलप्रमाणे : सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.

Share this story

Latest