Rishabh Pant hits fastest Test fifty
India vs Australia 5th Test (Rishabh Pant) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील शेवटचा सामना सिडनी येथे खेळला जात आहे. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात ऋषभ पंतची तुफानी शैली पाहायला मिळाली. पंतने खेळपट्टीवर येताच पहिल्या चेंडूवरच स्कॉट बोलंडला षटकार ठोकला. यानंतरही पंत इथेच थांबला नाही, त्याने प्रत्येक ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगली धुलाई केली. दुसऱ्या डावात पंतने अवघ्या 29 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह पंतने आपल्या नावावर एक विशेष विक्रम नोंदवला आहे.
पंतने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास....
सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंतने शानदार फलंदाजी करत अवघ्या 29 चेंडूत अर्धशतक झळकावले. आता पंत ऑस्ट्रेलियात सर्वात जलद कसोटी अर्धशतक करणारा पाहुणा फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडच्या जॉन ब्राउन आणि वेस्ट इंडिजच्या रॉय फ्रेडरिक्सच्या नावावर होता, ज्यांनी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये 33 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.
FIFTY IN JUST 29 BALLS - THE SECOND FASTEST BY AN INDIAN IN TESTS! 🙌@RishabhPant17 played a game-changing innings at the SCG! 🔥#AUSvINDOnStar 👉 5th Test, Day 2 | LIVE NOW! | #ToughestRivalry #BorderGavaskarTrophy pic.twitter.com/yGaTGAlDxv
— Star Sports (@StarSportsIndia) January 4, 2025
भारतासाठी दुसऱ्यांदा केली ही कामगिरी...
ऋषभ पंतचे कसोटी क्रिकेटमधील हे दुसरे सर्वात जलद अर्धशतक आहे. याआधी 2022 मध्ये पंतने श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये केवळ 28 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा पंत हा भारतीय फलंदाज आहे.
याशिवाय यशस्वी जैस्वाल आणि शार्दुल ठाकूर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येकी 31-31 चेंडूत अर्धशतके झळकावली आहेत. 1982 मध्ये टीम इंडियाचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांनी भारतासाठी पहिल्यांदाच सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला होता. कपिल देव यांनी पाकिस्तानविरुद्ध 30 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
पंतने केली 61 धावांची खेळी....
सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंतने केवळ 31 चेंडूत 61 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान पंतने 4 शानदार षटकार आणि 6 चौकार लगावले होते. यापैकी पंतने मिचेल स्टार्कविरुद्ध सलग दोन षटकार ठोकले होते.