India vs Australia 5th Test (Day 1 Stumps)
India vs Australia 5th Sydney Test Day 1 Highlights : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 ची पाचवी कसोटी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे खेळली जात आहे. सामन्याचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर टीम इंडियाचा डावा केवळ 185 धावांवर आटोपला. या काळात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी कहर केला. दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर टीम इंडियाने काहीसे पुनरागमन केले. चला तर मग जाणून घेऊया, सिडनी कसोटीचा पहिला दिवशी काय घडलं.
सिडनी कसोटीत नियमित कर्णधार रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमधून वगळून टीम इंडियाने मोठा निर्णय घेतला. रोहितच्या जागी उपकर्णधार जसप्रीत बुमराहकडे पाचव्या सामन्यासाठी टीम इंडियाची कमान सोपवण्यात आली होती. रोहित शर्माच्या जागी शुभमन गिलला प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवण्यात आले, मात्र गिलला पहिल्या डावात विशेष काही करता आले नाही आणि तोही अपयशी ठरला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या, प्रत्युत्तरात पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात एक विकेट गमावताना 09 धावसंख्येपर्यत मजल मारली आहे. दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने ख्वाजाला केएल राहुलकडे झेलबाद केले. ख्वाजा आऊट होताच पहिल्या दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा (Day 1 Stumps) करण्यात आली. ऑस्ट्रेलिया संघ सध्या 176 धावांनी पिछाडीवर असून खेळ थांबला तेव्हा सॅम कॉन्स्टास सात धावा करून क्रीजवर उपस्थित होता.
Stumps on Day 1 in Sydney!
— BCCI (@BCCI) January 3, 2025
Captain Jasprit Bumrah with the opening wicket for #TeamIndia 🙌
Australia 9/1, trail by 176 runs.
Scorecard - https://t.co/NFmndHLfxu#AUSvIND pic.twitter.com/Z3tFKsqwM2
टीम इंडिया पहिल्या डावात ठरली फ्लॉप....
तत्पूर्वी, सिडनी येथे खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या पाचव्या कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी कहर केला. शुक्रवारी (03 जानेवारी) सुरू झालेल्या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय चुकीचा ठरला, कारण प्रथम फलंदाजी करताना बुमराहच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया अवघ्या 185 धावांत गारद झाली.
भारतीय संघ केवळ 72.2 षटकेच खेळू शकला. ऋषभ पंतने संघाकडून सर्वाधिक 40 धावा केल्या. याशिवाय रवींद्र जडेजा 26, कर्णधार जसप्रीत बुमराह 22 धावा, शुभमन गिल 20 धावा, विराट कोहली 17 धावा आणि यशस्वी जैस्वाल 10 धावा करू शकला. याशिवाय इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. केएल राहुलला चार, प्रसिद्ध कृष्णाला तीन आणि मोहम्मद सिराजला तीन धावा करता आल्या. नितीश रेड्डी याला खातेही उघडता आले नाही. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत स्कॉट बोलंडने चार, तर मिचेल स्टार्कने तीन बळी घेतले. पॅट कमिन्सने दोन, तर नॅथन लायनला एक विकेट मिळाली.
विराट पुन्हा अपयशी....
भारताला 72 धावांवर चौथा धक्का बसला. या मालिकेत विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला. 17 धावा करून तो स्कॉट बोलंडचा बळी ठरला. पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूशी छेडछाड करण्याच्या प्रयत्नात चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये गेला. ब्यू वेबस्टरनं त्याचा झेल घेतला. पर्थच्या दुसऱ्या डावात शतक झळकावण्यापूर्वी आणि नंतर विराटचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. कोहलीने 69 चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये त्याने एकही चौकार न मारता 17 धावा केल्या.
बोलँड कोहलीसाठी डोकेदुखी
स्कॉट बोलँडने विराट कोहलीला आपला बळी बनवले. स्कॉट बोलँड हा कसोटी सामन्यांमध्ये विराट कोहलीसाठी डोकेदुखी ठरला आहे. विराट कोहलीचा स्कॉट बोलँडविरुद्धचा रेकॉर्डही खूपच खराब राहिला आहे. विराट कोहली कसोटी सामन्यात स्कॉट बोलँड विरुद्ध 6 डावात 4 वेळा बाद झाला आहे. जर आपण धावांबद्दल बोललो तर तो बोलँडविरुद्ध केवळ 32 धावा करू शकला. यामुळेच जेव्हा जेव्हा विराट कोहली बोलँडचा सामना करतो तेव्हा त्याची बॅट शांत राहिलेली आहे. या संपूर्ण मालिकेत विराट कोहली धावा काढण्यासाठी धडपडताना दिसत आहे.
शेवटच्या चेंडूवर टीम इंडियाचे पुनरागमन....
दिवसाचा खेळ संपण्याच्या काही वेळापूर्वीच टीम इंडिया ऑलआऊट झाली. यानंतर ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरला आणि कांगारू संघाकडून कॉन्स्टस आणि उस्मान ख्वाजा फलंदाजीसाठी सलामीला आले. डावाच्या पहिल्याच चेंडूवर कॉन्स्टन्सने बुमराहला चौकार ठोकत आपले इरादे दाखवले. त्यानंतर डावाचे तिसरे षटक टाकणाऱ्या बुमराह आणि कॉन्स्टन्समध्ये काही शाब्दिक चकमक झाली. ही चकमक 4 चेंडू टाकल्यानंतर झाली. दरम्यान, दिवसअखेर आणखी फक्त 2 चेंडू टाकायचे बाकी होते आणि बुमराहने दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर ख्वाजाला बाद करून टीम इंडियाचे काही प्रमाणात पुनरागमन केले. ख्वाजा केवळ 02 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे...
भारत : केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, प्रसीध कृष्णा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया : सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.