प्रातिनिधिक छायाचित्र....
Sydney Test Indian Captain : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 ची पाचवी आणि शेवटची कसोटी सिडनी येथे खेळली जात आहे. सिडनी कसोटीमध्ये टीम इंडियामध्ये आतापर्यंत बरेच चढ-उतार पाहायले मिळाले आहेत. या सामन्यात सर्वात मोठा बदल कर्णधार रोहित शर्माच्या रूपाने पाहायला मिळाला. रोहितला सिडनी कसोटीतून वगळण्यात आले. आता अचानक सामन्यादरम्यान विराट कोहलीला कर्णधार बनवण्यात आले. इकडे रोहितला वगळण्यात आलं आणि दुसऱ्या बाजूला विराटला कर्णधारपद मिळाले. चला तर मग जाणून घेऊया, काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि असा निर्णय का घेण्यात आला.
सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी उपकर्णधार जसप्रीत बुमराहकडे भारताची कमान सोपवण्यात आली होती. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराह अचानक मैदानाबाहेर गेला. बुमराह बाहेर पडल्यानंतर विराट कोहलीला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. अशाप्रकारे रोहित शर्माला वगळल्यानंतर बुमराहच्या अनुपस्थितीत कोहलीला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले.
बुमराह मैदानाबाहेर का गेला?
समालोचन करत असलेले रवी शास्त्री म्हणाले की, "बुमराहला संभाव्य दुखापतीमुळे स्कॅनिंगसाठी मैदानाबाहेर नेले गेले असावे. बुमराह प्रथम मैदानाबाहेर गेला आणि त्यानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर तो वैद्यकीय पथकासह स्टेडियममधून बाहेर पडताना दिसला. बुमराह मेडिकल टीम आणि सपोर्ट स्टाफसह कारमधून बाहेर आला. बुमराहचे असे बाहेर जाणे ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत बुमराहने 10 षटके टाकली आहेत, ज्यात त्याने 2 बळी घेतले आहेत.
रोहित शर्माला का वगळलं?
विशेष म्हणजे खराब फॉर्ममुळे रोहित शर्माला सिडनी कसोटीतून वगळण्यात आले होते. त्याने मालिकेतील तीन कसोटी खेळल्या आणि तिन्ही कसोटीत तो सपशेल फ्लॉप झाला. तीन सामन्यांच्या पाच डावांमध्ये हिटमॅनची सर्वोच्च धावसंख्या केवळ 10 धावांची होती. तीन सामन्यात मिळून त्याला फक्त 31 धावा करता आल्या.