IND vs AUS 5th Test (Day 2 Stumps)
IND vs AUS 5th Test (Day 2 Stumps) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी सिडनी क्रिकेट मैदानावर खेळली जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 181 धावांवर संपला.
शनिवारी या कसोटीचा दुसरा दिवस पार पडला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात सहा गडी गमावून 141 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. पहिल्या डावाच्या आधारे टीम इंडियाकडे चार धावांची आघाडी होती. अशा स्थितीत भारतीय संघाची एकूण आघाडी 145 धावांची झाली आहे. खेळ थांबला, तेव्हा रवींद्र जडेजा 39 चेंडूत एका चौकारासह 08 धावांवर तर वॉशिंग्टन सुंदर 17 चेंडूत 06 धावांवर नाबाद खेळत होते.
Stumps on Day 2 in Sydney.#TeamIndia move to 141/6 in the 2nd innings, lead by 145 runs.
— BCCI (@BCCI) January 4, 2025
Ravindra Jadeja & Washington Sundar at the crease 🤝
Scorecard - https://t.co/NFmndHLfxu #AUSvIND pic.twitter.com/4fUHE16iJq
भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली होती. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली होती. राहुल 13 धावा करून तर यशस्वी 22 धावा करून बोलँडचा बळी ठरला. शुभमन गिल 13 धावा करून वेबस्टारचा बळी ठरला. विराट कोहली पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूला स्पर्श करण्याच्या प्रयत्नात स्लिपमध्ये झेलबाद झाला. त्याला सहा धावा करता आल्या. बोलँडने पुन्हा एकदा कोहलीची शिकार केली. पंतने 33 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 61 धावांची धाडसी खेळी केली. त्याचवेळी नितीश रेड्डी सलग तिसऱ्या डावात अपयशी ठरला. त्याला चार धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून बोलँडने आतापर्यंत चार विकेट घेतल्या आहेत, तर कमिन्स आणि वेबस्टरला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
ऑस्ट्रेलिया 181 धावांवर गारद...
तत्पूर्वी, सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 181 धावांवर आटोपला. यामुळे भारतीय संघाने पहिल्या डावात 4 धावांची किरकोळ आघाडी घेतली. आज ऑस्ट्रेलियाने एक बाद नऊ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि 172 धावा करताना उर्वरित नऊ विकेट गमावल्या. यादरम्यान, ऑस्ट्रेलियाकडून ब्यू वेबस्टरने सर्वाधिक 57 धावा केल्या. याव्यतिरिक्त स्टीव्ह स्मिथनं 33, सॅम कॉन्स्टास 23 ,ॲलेक्स कॅरी 21 आणि कर्णधार पॅट कमिन्सनं 10 धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला धावांच्या बाबतीत दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारताकडून मोहम्मद सिराज आणि प्रसीध्द कृष्णाने प्रत्येकी 3 बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
भारताचा पहिला डाव...
भारताचा पहिला डाव 185 धावांवर आटोपला. भारतीय संघ केवळ 72.2 षटकेच खेळू शकला. ऋषभ पंतने संघाकडून सर्वाधिक 40 धावा केल्या. याशिवाय रवींद्र जडेजा 26, कर्णधार जसप्रीत बुमराह 22 धावा, शुभमन गिल 20 धावा, विराट कोहली 17 धावा आणि यशस्वी जैस्वाल 10 धावा करू शकला. याशिवाय इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. केएल राहुलला चार, प्रसिद्ध कृष्णाला तीन आणि मोहम्मद सिराजला तीन धावा करता आल्या. नितीश रेड्डी याला खातेही उघडता आले नाही. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलँडने चार, तर मिचेल स्टार्कने तीन बळी घेतले. पॅट कमिन्सला दोन, तर नॅथन लायनला एक विकेट मिळाली.