N. Djokovic vs R. Opelka
Brisbane | तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम विजेता अन् सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचला ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत 293व्या स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या रेली ओपेल्काकडून पराभव स्वीकारावा लागला. आपल्या वेगवान सर्व्हिसच्या जोरावर ओपेल्काने जोकोविचचा 7-6 (6), 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.
ओपेल्काने संपूर्ण सामन्यात 16 एसेस मारले आणि दोन्ही सेट एसेसने संपवले. हा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय आहे. उपांत्य फेरीत ओपेल्काचा सामना फ्रान्सच्या जियोवानी मपेत्शी पेरिकार्डशी होईल, पेरीकार्डनं जेकब मेन्सिकचा 7-5, 7-6 (5) असा पराभव केला. अन्य उपांत्य फेरीत जिरी लेहेकाचा सामना ग्रिगोर दिमित्रोव्हशी होईल. लेहकाने निकोलस जॅरीचा 6-4, 6-4 असा पराभव केला तर जॉर्डन थॉम्पसनने सामन्याच्या मध्यात माघार घेतल्यानंतर दिमित्रोव्हने अंतिम चारमध्ये प्रवेश केला. त्यावेळी दिमित्रोव्ह 6-1,2-1 ने आघाडीवर होता.
नववर्षाची सुरूवात पराभवानं.....
दरम्यान, जोकोविच वर्षातील पहिलीच स्पर्धा खेळत होता आणि ऑस्ट्रेलियन ओपनच्या तयारीसाठी ही स्पर्धा महत्वाची मानली जाते. पण जोकोविचला पराभवाचा धक्का बसला. हा 37 वर्षीय खेळाडू 24 वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन आहे. यापैकी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये त्याने 10 विजेतेपदे जिंकली आहेत, जी स्पर्धा येत्या 12 जानेवारीपासून मेलबर्नमध्ये सुरू होईल.
सबालेन्काही उपांत्य फेरीत....
महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित आर्यना सबालेन्का हिने मेरी बोझकोव्हाचा 6-3, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. मीरा अँड्रीवाने ओन्स जाबेरचा 6-4,7-6 असा पराभव केला. पोलिना कुडर्मत्सोवाने ॲश्लिन क्रुगरचा 7-6,6-3 असा पराभव केला. ॲनालिना कॅलिनिनाने किम्बर्ली बिरेलचा 4-6, 6-1, 7-5 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.