IND vs AUS 5th Test (Day 2) : सिडनीमध्ये भारतीय गोलंदाजांचाही भेदक मारा, कांगांरू पहिल्या डावात 181 धावांवर गारद...

सिडनी कसोटीत भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 181 धावांत गुंडाळले. टीम इंडियाला पहिल्या डावात 4 धावांची आघाडी मिळाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 4 Jan 2025
  • 10:30 am
IND vs AUS 5th Test,

IND vs AUS 5th Test (Day 2)

IND vs AUS 5th Test (Day 2) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना सिडनीत सुरू आहे. शनिवारी या कसोटीचा दुसरा दिवस आहे. भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 181 धावांवर आटोपला.

सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 181 धावांवर आटोपला. यामुळे भारतीय संघाने पहिल्या डावात 4 धावांची किरकोळ आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या ब्यू वेबस्टरने अर्धशतक झळकावत सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये भारतासाठी पहिला सामना खेळणारा प्रसिध्द कृष्णानेही खूप प्रभावित केले, ज्याने कांगारू संघाच्या 3 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

आज ऑस्ट्रेलियाने कालच्या एक बाद नऊ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि 172 धावा करताना उर्वरित नऊ विकेट गमावल्या. बुमराहने मार्नस लॅबुशेनला यष्टिरक्षक पंतकरवी झेलबाद केले. त्याला केवळ 2 धावा करता आल्या. त्यानंतर सिराजचा कहर दिसला. त्याने डावाच्या 12व्या षटकात सॅम कॉन्स्टास आणि ट्रॅव्हिस हेडला माघारी धाडलं. कॉन्टासला 23 तर हेडला 04 धावा करता आल्या.यानंतर प्रसिद्ध कृष्णाने स्टीव्ह स्मिथला राहुलकरवी झेलबाद केले. त्याला 33 धावा करता आल्या. स्मिथला बाद केल्यानंतर प्रसिद्धनं  ॲलेक्स कॅरीला क्लीन बोल्ड केले. कॅरीला 21 धावा करता आल्या. दरम्यान, पदार्पण करणाऱ्या ब्यू वेबस्टरने अर्धशतक झळकावले. त्यानंतर नितीश रेड्डींचा कहर बघायला मिळाला.

नितीश रेड्डीनेही अप्रतिम गोलंदाजी करत सलग दोन चेंडूंत दोन बळी घेतले. ऑस्ट्रेलियाच्या डावातील 45 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्यानं कर्णधार पॅट कमिन्सला कोहलीकरवी झेलबाद केले. कमिन्सला 10 धावा करता आल्या. यानंतर नितीशने डावाच्या 47व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मिचेल स्टार्कला राहुलकडे झेलबाद केले. स्टार्कला एक धाव करता आली. मात्र, नितीश हॅटट्रिक घेण्यास मुकला आणि लियॉनने त्याचा चेंडू लेग साईडला खेळून एक धाव घेतली आणि हॅटट्रिक होण्यापासून रोखले. ऑस्ट्रेलियाला 166 धावांवर नववा धक्का बसला. प्रसिद्ध कृष्णानं ब्यू वेबस्टरला यशस्वीकरवी झेलबाद केले. वेबस्टर 105 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 57 धावा करून बाद झाला. त्यानंतर सिराजने बोलँडला (09 धावा) क्लीन बोल्ड केले आणि ऑस्ट्रेलियन डाव 181 धावांवर आटोपला.

 बुमराहने मैदान सोडले...

विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने सहा विकेट गमावल्यानंतर कर्णधार बुमराहने संभाव्य दुखापतीमुळे मैदान सोडले आणि स्कॅनिंगसाठी रुग्णालयात गेला. बुमराहच्या अनुपस्थितीत भारताच्या उर्वरित वेगवान गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत उर्वरित चार विकेट झटपट काढल्या. बुमराहच्या अनुपस्थितीत कोहली कर्णधार होता. मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णाने प्रत्येकी तीन तर नितीश रेड्डी आणि बुमराहने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

IND vs AUS 5th Test : भारताचा पहिला डाव...

भारताचा पहिला डाव 185 धावांवर आटोपला. भारतीय संघ केवळ 72.2 षटकेच खेळू शकला. ऋषभ पंतने संघाकडून सर्वाधिक 40 धावा केल्या. याशिवाय रवींद्र जडेजा 26, कर्णधार जसप्रीत बुमराह 22 धावा, शुभमन गिल 20 धावा, विराट कोहली 17 धावा आणि यशस्वी जैस्वाल 10 धावा करू शकला. याशिवाय इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. केएल राहुलला चार, प्रसिद्ध कृष्णाला तीन आणि मोहम्मद सिराजला तीन धावा करता आल्या. नितीश रेड्डी याला खातेही उघडता आले नाही. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलँडने चार, तर मिचेल स्टार्कने तीन बळी घेतले. पॅट कमिन्सला दोन, तर नॅथन लायनला एक विकेट मिळाली.

Share this story

Latest