Sana Ganguly Accident | सौरव गांगुलीची मुलगी अपघातात थोडक्यात बचावली, सनाच्या कारला बसची जोरदार धडक....

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची मुलगी सना गांगुली हिच्या कारला कोलकात्यातील डायमंड हार्बर रस्त्यावर एका बसने धडक दिल्याची घटना घडली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 4 Jan 2025
  • 04:18 pm
Sana Ganguly,

संग्रहित छायाचित्र....

Sana Ganguly Accident Update : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची मुलगी सना गांगुली हिच्या कारला कोलकात्यातील डायमंड हार्बर रस्त्यावर एका बसने धडक दिल्याची घटना घडली आहे. मात्र, यामध्ये सनाला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. डायमंड हार्बर रस्त्यावरील बेहाला चौरस्ता परिसरात बसने सना गांगुलीच्या कारला धडक दिली. यावेळी सना गांगुली ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसली होती.

या अपघातानंतर बसचालकाने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण सना गांगुलीच्या कारच्या चालकाने त्याचा पाठलाग करत साखर बाजारजवळ त्याला गाठले. यानंतर सना गांगुलीने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बस ड्रायव्हरला अटक केली. शुक्रवारी (दि. ३) संध्याकाळी घडलेल्या अपघाताच्या ठिकाणापासून सौरव गांगुलीचे घर अवघ्या दोनशे मीटर अंतरावर आहे.

अपघातावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी सांगितले की, कोलकात्याहून रायचककडे जाणारी बस अचानक सना गांगुलीच्या कारला धडकल्याने हा अपघात झाला. सना गांगुली या अपघातातून थोडक्यात बचावली कारण, ती कारमध्ये चालकाच्या शेजारच्या सीटवर बसली होती. दरम्यान गांगुली कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार मिळाल्यानंतर, कोलकाता पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रॅश ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी आरोपी बसचालकाला अटक केली.

Share this story

Latest