भारताच्या बॅडमिंटनपटूंची चीनवर मात
#नवी दिल्ली
सात्त्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या बॅडमिंटन खेळातील अव्वल दर्जाच्या दुहेरी जोडीने बासेल येथील स्विस ओपन २०२३ च्या मोसमातील पहिले विजेतेपद जिंकले आहे. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात सात्त्विक आणि चिराग यांनी दुहेरीचे विजेतेपद पटकावले आणि चीनच्या रेन झियांग यू आणि तांग कियांग यांचा सरळ गेममध्ये पराभव केला.
सात्त्विक आणि चिराग यांनी जागतिक क्रमवारीत २१ नंबरवरील या जोडीचा २१-१९, २४-२२ असा ५४ मिनिटांत पराभव करून नव्या हंगामात स्थान मिळवले. रेन आणि तांग या प्रतिस्पर्धी खेळाडूंनी जोरदार बचावात्मक कामगिरी करूनही भारताच्या या स्टार खेळाडूंनी अखेरपर्यंत सामन्यावर नियंत्रण ठेवत सामना जिंकला. भारताच्या या दुहेरी जोडीचे प्रशिक्षक मॅथियास बोए यांनी उत्तम प्रशिक्षण दिल्याचे यावेळी दिसून आले.
जेव्हा सात्त्विक आणि चिरागने रेन आणि टँगला तिसऱ्या गेममध्ये मात देत चौथ्या मॅच पॉइंटच्या रूपात विजय मिळवला तेव्हा तेथे उपस्थित सर्व भारतीय चाहत्यांनी आनंद साजरा केला. चिरागने तर थेट टी शर्ट काढून आपला आणि देशाचा विजय साजरा केला. सात्त्विक आणि चिराग यांचे हे बासेलमधील पहिले विजेतेपद होते आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये फ्रेंच ओपन सुपर -७५० च्या विजयानंतर या दौऱ्यातील त्यांचे पहिले विजेतेपद होते. जागतिक क्रमवारीत ६ व्या क्रमांकावर असलेल्या या जोडीने २०२२ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकासह तब्बल ३ विजेतेपदे जिंकली. त्यांनी जागतिक स्पर्धेतही कांस्यपदक मिळवले. दरम्यान सात्त्विक दुखापतीच्या चिंतेने त्रस्त होता. ज्यामुळे त्याला फेब्रुवारी २०२३ मध्ये बॅडमिंटन आशिया मिश्र सांघिक चॅम्पियनशिपला मुकावे लागले होते.