इतिहासाची पुनरावृत्ती!
#लखनौ
आयपीएलचा १६ वा हंगाम धावांचा पाऊस आणि अटीतटीचे सामने यामुळे गाजत असतानाच सोमवारी (दि. १) दोन दिग्गज खेळाडूंमधील वाद त्याहीपेक्षा गाजला. लखनौ सुपरजायंट्सचा मेंटाॅर गौतम गंभीर आणि राॅयल चॅलेंजर्सचा आधारस्तंभ विराट कोहली यांच्यातील जुना वाद उभय संघांतील सोमवारच्या सामन्यानंतर उफाळून आला. या निमित्ताने गंभीर आणि विराट यांच्यात २०१३ मध्ये घडलेल्या मोठ्या वादाची १० वर्षांनंतर यंदा पुनरावृत्ती दुर्दैवाने बघायला मिळाली.
लखनौच्या एकाना मैदानावरील बाॅलिंग पिचवर झालेल्या लो स्कोअरिंग सामन्यात बंगलोरने यजमान लखनौ संघावर १८ धावांनी मात केली. बंगलोरच्या ९ बाद १२६ धावांच्या उत्तरात लखनौ संघ १९.५ षटकांत १०८ धावांवर गारद झाला. सामन्यादरम्यान उभय संघांतील खेळाडूंत खडाजंगी झाली. सामन्यानंतरही ती अधिक तीव्र झाली. गंभीर आणि विराट या दिल्लीच्या खेळाडूंमधील वाद या निमित्ताने पुन्हा एकदा उफाळून आला. या दोघांत मारामारी होते की काय, असे वाटत असतानाच लखनौचा कर्णधार केएल राहुल, अमित मिश्रा आणि बंगलोरच्या खेळाडूंनी मध्यस्थी करत गंभीर आणि विराट यांना बाजूला नेले. आयपीएलदरम्यान या दोघांमध्ये वाद होण्याची ही पहिलीच घटना नाही. दहा वर्षांपूर्वी आयपीएलच्या सहाव्या हंगामातील एका सामन्यादरम्यान आणि नंतरही या दोन खेळाडूंमध्ये अशीच भयंकर बाचाबाची झाली होती.
तेव्हा विराट बंगलोरचा तर गंभीर कोलकाता संघाचा कर्णधार होता. सामन्यात सुरुवातीला विराटचा रजत भाटियासोबत वाद झाला होता. कोलकात्याने ८ बाद १५४ धावा केल्यानंतर बंगलोरने १७.३ षटकांत २ बाद १५८ धावा फटकावत हा सामना सहज जिंकला. त्यात विराटने संघाच्या विजयाला हाताभार लावणारी ३५ धावांची उपयोगी खेळी केली होती. विराट बाद होऊन तंबूत परतत असताना रजत भाटिया आणि काही खेळाडूंनी विराटला पुन्हा डिवचले. विराट त्या खेळाडूंशी आणि पंचाशी बोलत असताना गंभीरही मध्ये पडला. त्यानंतर या दोन खेळाडूंत धक्काबुक्की होण्यापर्यंत मजल गेली.
बंगलोर-लखनौ सामन्यात उभय खेळाडूंत पुन्हा वाद झाला. या वादानंतर, लखनौचा मेंटाॅर गौतम गंभीर आणि बंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहली यांना आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल मॅच फीच्या १०० टक्के दंड ठोठावण्यात आला. लखनौचा गोलंदाज नवीन-उल-हकलाही त्याच्या मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. कोहली आणि नवीनने आपली चूक मान्य केली आहे.
सामन्यात काय घडले?
लखनौ संघ धावांचा पाठलाग करत असताना चौथ्या षटकात कृणाल पंड्या आणि आयूष बदोनी फलंदाजी करत होते. ग्लेन मॅक्सवेलच्या तिसऱ्या चेंडूवर पंड्याने लाँग ऑनच्या दिशेने मोठा फटका मारला. विराटने झेल घेत पंड्याला बाद केले. नंतर त्याने स्टँडकडे बघत छाती ठोकली आणि तोंडावर बोट ठेवून इशारा केला. गंभीर डगआऊटमध्ये बसून हे सर्व पाहात होता.
१७ व्या षटकात नवीन उल हकची कृती पंचांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी विराट धावत आला. नवीनला पाहून त्याने हातवारे केले. यामुळे नवीन भडकला आणि दोघांत वाद सुरू झाला. दिनेश कार्तिक आणि पंचांनी दोघांनाही शांत केले.
सामन्यानंतर विराट प्रतिस्पर्धी संघातील सर्व खेळाडूंशी हस्तांदोलन करीत असताना नवीनने पुन्हा वाद उकरून काढला. हा वाद चिघळण्यापूर्वीच आरसीबीचे खेळाडू विराटला दूर घेऊन गेले.
त्यानंतर विराटने लखनौचा अष्टपैलू खेळाडू काइल मेयर्ससोबत गप्पा मारायला सुरुवात केली. त्यावेळी गंभीर आला आणि मेयर्सला सोबत घेऊन जाऊ लागला. त्याचवेळी गंभीरने काहीतरी खोड काढल्यावर विराटने त्याला प्रत्युत्तर दिले. यामुळे वाद भडकला. प्रकरण हातघाईवर आले असताना राहुल, अमित मिश्रा, पंच आणि लखनौचे कोचिंग स्टाफ सदस्य विजय दहिया यांनी हस्तक्षेप करत वाद रोखला.
या मोसमात लखनौ सुपर जायंट्सने १० एप्रिल रोजी बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा पराभव केला. त्यानंतर लखनौचा मेंटाॅर गौतम गंभीरने स्टँडकडे बोट दाखवत आक्षेपार्ह हातवारे केले. गंभीरच्या त्याच कृत्याची परतफेड विराटने केल्यावर गंभीर आणि इतर खेळाडूंना ते सहन झाले नाही. यामुळे वाद वाढला.
वृत्तसंस्था