थोडी तरी लाज बाळगा...
#नवी दिल्ली
विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात झालेल्या वादविवादामुळे संपूर्ण क्रीडाविश्वात खळबळ माजली आहे. अनेक दिग्गज खेळाडूंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. खेळाडूंनी एकमेकांचा आदर सन्मान न ठेवल्याने सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंनी कसे वागायला पाहिजे, यावरही माजी खेळाडूंकडून भाष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर इंटरनेटवर सचिन तेंडुलकर आणि जॉंटी ऱ्होड्स यांचा जुना व्हीडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हीडीओ अल्पावधीतच चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
या व्हीडीओने तमाम चाहत्यांची मने जिंकली आहेत. नेटकऱ्यांनी या व्हीडीओवर भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका सामन्यादरम्यान मैदानात खेळाडूंचे हस्तांदोलन सुरू असताना दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू जॉंटी ऱ्होड्स सचिनचे पाय धरताना या व्हीडीओत दिसत आहे. त्याचदरम्यान सचिन जॉंटीचा हात पकडून गळाभेट देतो. हा प्रसंग चाहत्यांना खूप आवडला असून विराट-गंभीरने या अनुभवी खेळाडूंकडून चांगल्या गोष्टी शिकाव्या, असा सल्ला चाहत्यांनी दिला आहे. एकीकडे क्रिकेटच्या मैदानात खेळाडू एकमेकांना सन्मान देत नसल्याचे समोर आले आहे, तर दुसरीकडे जॉंटी आणि सचिनच्या या व्हीडीओने खिलाडू वृत्तीचे उत्तम उदाहरण दिले आहे. जेव्हा जॉंटी ऱ्होड्स क्रिकेट खेळत होता, त्यावेळी मैदानावर सचिनच्या विरोधात खेळाची रणनीती आखायचा, पण मैदानाबाहेर दोघेही एकमेकांचा खूप आदर करायचे. परंतु, कोहली, गंभीर आणि नवीन उल हकने खेळाचे स्वरूप बदलून टाकले आहे. त्यामुळे क्रीडाविश्वात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही दोन्ही खेळाडूंवर सडकून टीका केली होती. दोघांनाही कठोर शिक्षा दिली पाहिजे, असे गावसकर यांनी म्हटले आहे. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने दोघांवरही बंदी घालायला हवी, अशी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना सेहवागने दोघांनाही फटकारले आहे. माझी मुलेही सामना पाहतात आणि ‘बेन स्टोक्स’चा अर्थ त्यांना समजतो, अशा शब्दात सेहवागने प्रतिक्रिया दिली आहे.